इस्लामविरोधी असल्याचा आरोप करत इम्रान सरकारने घातली PUBG वर बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारने लोकप्रिय मोबाइल गेम PUBG वर बंदी घातली आहे. हा खेळ इस्लामविरोधी असल्याचा आरोपही सरकारने केला आहे. सरकारने या गेमचे आरोग्यास हानिकारक असल्याचे वर्णन केले आणि म्हटले की, हे एक अत्यन्त वाईट असे व्यसन आहे. सरकारने याबाबत म्हटले आहे की, या गेमच्या व्यसनामुळे तरुणांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक अर्थाने परिणाम होत आहेत. तहरीक-ए-इंसाफ पक्षाला PUBG या गेमवरील निर्बंधामुळे तरुणांच्या रोषाचा फटका सहन करावा लागू शकतो हे उघड आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुकही होत आहे.

तहरीक-ए-इंसाफला निवडणुकीत होऊ शकतो त्रास
भारताप्रमाणेच पाकिस्तानमधील तरुणांमध्येही पबजी हा एक अतिशय लोकप्रिय असा मल्टीप्लेअर मोबाइल गेम आहे. या गेमवर बंदी घालून असा अंदाज वर्तविला जात आहे की, आगामी निवडणुकीत तरुण मतदारांनी इम्रानच्या पक्षाला मतदान करू नये. पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन अथॉरिटीने म्हटले आहे की, पबजी गेममुळे देशातील तरुणांवर मानसिक दबाव येत आहे. या परिस्थितीत तरुणांमधील आत्महत्येच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत तीन तरुणांनी आत्महत्या केलेली आहे. पीटीएने इस्लामाबाद उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान असे म्हटले आहे की पबजी गेममधील काही दृश्ये ही इस्लामविरोधी आहेत, ज्याला पाकिस्तानमध्ये परवानगी दिली जाऊ शकत नाही.

2013 सालीही पाकिस्तानात त्याच्यावर बंदी घालण्यात आली होती
पाकिस्तान सरकारने 2013 मध्ये कॉल ऑफ ड्यूटी आणि मेडल ऑफ ऑनरवर बंदी घातली होती. या खेळांवर बंदी घालण्याबाबत सरकारने असा युक्तिवाद केला होता की, या खेळांमध्ये पाकिस्तानला अतिरेक्यांचे ठिकाण असल्याचे दाखविले गेले. त्याच वेळी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि अल कायदासह अनेक दहशतवादी संघटनांमध्ये संबंध असल्याचेही दाखविले गेले.

पाकिस्तानमध्ये चीनचे लोकप्रिय व्हिडिओ अ‍ॅप टिकटॉकवर बंदी घालण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये बंदी घालण्यासाठी धार्मिक कारणे दिली गेली आहेत. या अर्जामध्ये असे म्हटले गेले आहे की, सोशल मीडियावर इस्लामविरोधीची माहिती टिकटॉकद्वारे शेअर केली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.