कराची । सन १९९९ मध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपहरणानंतर भारताने सुटका केलेल्या आणि डेनियल पर्ल या अमेरिकन पत्रकाराची हत्या करणाऱ्या उमर शेखसह इतर दहशतवाद्यांची तुरुंगातून तात्काळ सुटका करण्याचे आदेश सिंध हायकोर्टाने दिले आहेत. डॅनियल पर्ल हत्याकांड प्रकरणात सुटका करण्यात येणाऱ्या दहशतवाद्यांमध्ये अहमद उमर शेखसह फहाद नसीम, सईद सलमान साकिब आणि शेख मोहम्मद आदिल यांचा आहे. उमर शेख व इतर दहशतवाद्यांची सुटका करण्यामागे आयएसआयचा हात असल्याचा चर्चा सुरू आहे.
याआधी दोन एप्रिल २०२० मध्ये हायकोर्टाने १८ वर्षाच्या शिक्षेनंतर दहशतवाद्यांच्या याचिकेनंतर शेख, साकिब आणि नसीम या तिघांची मुक्तता करण्यात आली होती. कोर्टाने शेखला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेऐवजी ७ वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आणि २० लाखांचा दंड ठोठावला. उमर शेखने याआधीच १८ वर्षे तुरुंगात काढली आहेत. त्यामुळे त्याची सात वर्षाची शिक्षा पूर्ण झाली. डॅनियल पर्ल हे वॉल स्ट्रीट जर्नलचे दक्षिण आशिया ब्युरोचे प्रमुख होते. वर्ष २००२ मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी त्यांचे अपहरण करत त्यांची हत्या केली होती.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील दबावामुळे पाकिस्तान सरकारने उमर शेखला सोडण्याचे आदेश दिल्यानंतरही दहशतवादविरोधी कायद्यानुसार तुरुंगात ठेवले आहे. सिंध हायकोर्टाने आपल्या आदेशात या दहशतवाद्यांची सुटका करण्याचे आणि त्यांचे नाव नो फ्लाय यादीत ठेवण्याचे आदेश दिले. जेणेकरून त्यांना देशाबाहेर जाता येणार नाही. कोणताही गुन्हा केला नसताना त्यांना तुरुंगात ठेवणे चुकीचे असल्याचे कोर्टाने म्हटले. उमर शेखला निर्दोष सोडण्याबाबत कोर्टाच्या निर्णयावर मोठी टीका झाली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद यांनीदेखील या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले होते. तर, नॅशनल प्रेस क्लब आणि नॅशनल प्रेस क्लब जर्नलिझम इन्स्टिट्यूटने पाकिस्तान कोर्टाला या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन केले होते.
आयएसआयचा डाव?
उमर शेख व इतर दहशतवाद्यांची सुटका करण्याचा हा पाकिस्तानच्या आयएसआयचा डाव असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अमेरिका सध्या करोनाने हैराण झाली असून तूर्तास इतर देशांमध्ये हस्तक्षेप करणार नसल्याचे आयएसआयला वाटत आहे. त्याशिवाय सध्या लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद आणि जैशचा म्होरक्यावर अमेरिकेचे लक्ष आहे. त्यामुळे हे दोन्हीजण पाकिस्तानच्या एफएटीएफच्या ग्रे यादीतून बाहेर येऊ शकले नाहीत.
उमरची तुरुंगातून सुटका केल्यास भारताविरोधात दहशतवादी कारवाया करता येतील असे आयएसआय आणि पाकिस्तानी लष्कराला वाटत असल्याचे म्हटले जात आहे. १९९४ मध्ये काश्मीरमधून उमरने चार परदेशी पर्यटकांचे अपहरण केले होते. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत उमरला अटक करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी १९९९ मध्ये एअर इंडियाचे विमान अपहरण केल्यानंतर भारताने सुटका केलेल्या दहशतवाद्यांमध्ये त्याचा समावेश होता.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’