पालघरमध्ये जे झालं ते दुर्दैवी पण सोशल मीडियातून आगी लावणाऱ्यांनो खबरदार..- मुख्यमंत्री

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई। गेल्या पाच वर्षांपासून देशात ठिकठिकाणी मॉब लिंचिंग झालंय. त्यात आता आपल्याला जायचं नाही. पालघरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल सरकार काय करतंय हे मला सांगायचंय असं म्हणत आज मुख्यमंत्री ठाकरे यांनी फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून पालघर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली. पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद आहे. दोन साधू सरळ मार्गाने जाता येत नाही दुर्गम भागातून जात होते. गडचिंचली हे गाव अत्यंत दुर्गम भागात आहे. तिथं गैरसमजुतीनं साधूंवर हल्ला केला गेला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

केंद्रशासित प्रदेशात त्यांना प्रवेश नाकारला गेला. तिथून त्यांना परत पाठवलं गेलं. त्यानंतर ही घटना घडली. हे साधू गुजरातमध्ये चालले होते. त्यांना तिथं प्रवेश दिला गेला नाही. त्यांना ताब्यात घेतलं गेलं असतं आणि महाराष्ट्र सरकारशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी त्यांच्याबाबतीत निर्णय घेतला गेला असता तर ही घटना घडली नसती, अशी स्पष्टोक्ती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.

साधूंची हत्या झालीय. तुम्ही गप्प का? असा सवाल आम्हाला विचारला जात आहे मात्र, आम्ही गप्प बसलेलो नाही. पालघरच्या घटनेतील कुणालाही सोडलेलं नाही. सोडणार नाही. ही घटना रात्री जेव्हा घडली तेव्हा एवढ्या रात्री पोलीस पोहचले. पहाटे पाचच्या सुमारास पोलिसांनी आरोपींना पकडलं. आम्ही कारवाई केलेली आहे या प्रकरणावरुन राजकारण नको असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली आहे. यामध्ये नऊ मुलं अल्पवयीन आहेत त्यांना सुधारगृहात पाठवण्यात आलं आहे. तसंच या प्रकरणातल्या पाच म्होरक्यांनाही अटक केली आहे असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

जे लोक धर्माचं राजकारण करु पाहात आहेत त्यांनी ते करु नये. मी या घटनेत जात-पात-धर्म पाहिलेला नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. पालघरमध्ये जे झालं ते दुर्दैवी. पण आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न कुणी करू नका. हा कुठल्याही धर्माचा मामला नाही त्यामुळं सोशल मीडियातून आगी लावणाऱ्यांनाही चाप लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. सोशल मीडियावर आगी लावणाऱ्यांचा शोध घ्या असे मी अमित शाहंना सांगितले आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

Leave a Comment