धक्कादायक ! पणजोबांनीच चिमुरडीवर केले लैंगिक अत्याचार; न्यायालयाने दिली ‘हि’ शिक्षा

अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये आजोबा आणि नातीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या पणजोबाला पोक्सोच्या विशेष न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. हा प्रकार 10 नोव्हेंबर 2018 रोजी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशनअंतर्गत घडला होता. या प्रकरणातील पीडित नात हि साडेतीन वर्षाची आहे. या प्रकरणाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने तीन लाखांचा दंड ठोठावला असून दीड लाख रुपये पीडित नातीला देण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे प्रकरण
आरोपी व फिर्यादीची मुलगी हे जवळजवळ राहत होते. फिर्यादी या साडेतीन वर्षाच्या नातीला घरी ठेवून दहा नोव्हेंबर 2018 रोजी नेहमीप्रमाणे कामाला गेल्या होत्या. यानंतर आरोपी हा नातीला भेटला. तिच्याशी गोड बोलून तिच्यावर अत्याचार केला. यानंतर फिर्यादी जेव्हा घरी आल्या तेव्हा पीडित मुलगी वारंवार रडत होती. तेव्हा तिने आपल्या आजीला गुप्तांग दुखत असल्याचे सांगितले. जेव्हा आजीने याबाबत विचारले असता तिने डोंगरे आबा आले होते, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादी यांनी मुलीला नीट तपासले असता तिची परिस्थिती बरी नव्हती. म्हणून त्यांनी तिला थेट सिव्हिल लाइन पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले.

यानंतर फिर्यादीने यादवराव अर्जुनराव डोंगरे याच्यावर 376 (2), (एफ) आणि पोक्सो 4, 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पोलिसांनी तातडीने दखल घेत यादवराव डोंगरे यास अटक केली आहे. तेव्हापासून हा आरोपी जिल्हा कारागृहात बंद आहे.याप्रकरणी पोक्सो विशेष न्यायालयाने 11 साक्षीदारांची साक्ष घेतली. एकही साक्षीदार फितूर झाला नाही. यामध्ये वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष महत्वाची ठरली. यानंतर पोक्सो विशेष न्यायालयाचे अतिरिक्त स्तर न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी याप्रकरणी आरोपी यादवराव डोंगरे यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसेच तीन लाखांचा दंडदेखील भरण्यास सांगितला आहे. जर आरोपीने दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा देण्यात येणार आहे. तसेच या दंडामधील दीड लाखांची रक्कम पीडितेला देण्याचे आदेश न्यायाधीशांकडून देण्यात आले आहेत. सहायक सहकारी वकील ऍड. मंगला पांडे यांनी सरकारी पक्षातर्फे काम पहिले आहे.