व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सावकारी जाचाला कंटाळून तरुणाने उचललं ‘हे’ टोकाचे पाऊल

पंढरपूर : हॅलो महाराष्ट्र – पंढरपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सावकरी जाचाला कंटाळून एका तरुणाने आत्महत्या केली आहे. व्याजाच्या पैशात लिहून दिलेले घर सावकाराने परस्पर विकल्याने या तरुणाला मानसिक धक्का बसला. हा धक्का सहन न झाल्याने या तरुणाने गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. संतोष प्रकाश साळुंखे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात खासगी सावकारा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
संतोष साळुंखे याने पंढरपुरातील खासगी सावकार शेखर कुंदरकर, सुवर्णा अंकुश बिडकर आणि अंकुश रामा बिडकर यांच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्यांचे पैसे व्याजासह संतोष यांनी परत केले होते. मात्र पैसे परत केलेले असतानासुद्धा या तिघांनी संतोषला व्याजाची जादा रक्कम दे म्हणून मारहाण केली. तसेच या सावकारांनी व्याजाच्या पैशात लिहून‌ घेतलेल्या घराची परस्पर विक्री केली. याचा मानसिक धक्का सहन न झाल्याने संतोष याने हे टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी संशयित आरोपी शेखर दत्तात्रय कुंदरकर याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

ऑगस्ट 2021 मध्येदेखील सावकारी जाचाला कंटाळून एका एका मॉड्युलर फर्निचर व्यावसायिकाने आत्महत्या केली होती. तुषार माणिकराव साठवणे असे आत्महत्या केलेल्या व्यापाऱ्याचे नाव होते. या व्यावसायिकाने यवतमाळमधील वडगाव परिसरात मॉड्युलर फर्निचरचा व्यवसाय सुरु केला होता. लॉकडाऊनच्या काळात त्याचे दुकान पुर्णतः बंद होते. त्यानंतर अनलॉकच्या प्रक्रियेत दुकान उघडण्यासाठी तुषार यांनी खाजगी सावकार ताटी पलूमवार यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. यावेळी तुषार यांनी व्यवसाय पूर्ववत सुरू झाला की कर्जाची परत फेड करू असे सांगितले होते. परंतु कर्जाच्या व्याजासाठी सावकाराकडून तगादा लावण्यात तसेच अपमानस्पद वागणूक देण्यात आली होती. यानंतर या सगळ्या जाचाला कंटाळून तुषार यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.