वाई | तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात येऊन राज्य करणार काय, थांब तुला दाखवतो, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणत पाणीपुरीचा गाडा चालकांची एकाने तलावरीने बोटे छाटल्याची घटना घडली. वाई येथील महागणपती मंदिराजवळ पाणीपुरीचा गाडा चालविणाऱ्या परप्रांतीय तरुणावर एकाने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. भरदुपारी बारा वाजता हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, दोन्ही हातात तलवारी घेऊन दहशत माजवत शहराच्या मध्यवस्तीतील मद्याची दुकाने बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या हल्लेखोराला वाई पोलिसांनी त्वरित अटक केली. अजय गोपी घाडगे (वय- 23, रा. लाखानगर, वाई) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रिकू मुन्नीलाल ठाकूर (वय- 38, रा. साक्षीविहार, सह्याद्रीनगर-वाई, ता. वाई, जि. सातारा, मूळ रा. ग्वाल्हेर ता. जि. ग्वाल्हेर, मध्यप्रदेश) असे जखमीचे नाव आहे. त्याचा महागणपती मंदिराजवळ पाणीपुरीचा गाडा आहे. त्याने सकाळी नेहमीप्रमाणे दहा वाजता व्यवसाय सुरू केला. काही वेळाने रस्त्यात समोरून दोन्ही हातात तलवारी घेऊन एक जण आला. तो म्हणाला, पाणीपुरीवाला भैय्या तू कुठला आहेस. मी मध्यप्रदेशमधील असून, चार वर्षांपासून प्रामाणिकपणे पोटासाठी व्यवसाय करीत आहे. माझा कोणाला त्रास नाही, असे सांगितले. त्यावर त्याने तुम्ही भैय्ये महाराष्ट्रात येऊन राज्य करणार काय, थांब तुला दाखवतो, तुला जिवंत सोडणार नाही, असे म्हणून त्याने त्याच्या हातातील तलवारीने डोक्यात वार केला. त्यावेळी खाली वाकून बचावासाठी दोन्ही हात डोक्यावर धरून तलवारीचा वार अडविला असता उजव्या हाताचे मधले बोट तुटून खाली पडले तसेच इतर तिन्ही बोटांना व डाव्या हाताच्या तळव्यावर गंभीर दुखापत झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, त्यापूर्वी हल्लेखोराने मध्यवस्तीतील दारूच्या गुत्त्यावर जाऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दुकान चालकांना दमदाटी केली. दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यानंतर किसन वीर चौक चौकात असणाऱ्या वाईन शॉपमध्ये घुसून येथील फर्निचरची व काचांची मोडतोड केली. दुकानात दहशत माजवत ग्राहकांना बाहेर काढले व दुकान बंद करण्यासाठी धमकी दिली, अशी तक्रार सहा दुकानदारांनी पोलिसात दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक कृष्णकांत पवार, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे व पोलिस कर्मचाऱ्यांनी जाऊन शहरात दहशत माजविणाऱ्या हल्लेखोराला ताब्यात घेतले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्यानंतर सायंकाळी पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या दालनात व्यापाऱ्यांची बैठक सुरू होती.