हुंड्यासाठी छळ केल्याने विवाहितेची आत्महत्या : सासूसह चाैघांवर गुन्हा दाखल

फलटण | सोनगाव (ता. फलटण) येथे माहेरच्या लोकांनी हुंडा दिला नाही. त्यामुळे विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली होती. विवाहितेचा छळ व जाचहाट करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू, सासरे, दीर व जाऊ अशा चौघांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उज्ज्वला अनिल येजगर असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी उज्वला यांचा भाऊ लक्ष्मण शंकर भुसनर (वय 27, रा. हटकरवाडी, ता. शिरूर, जि. बीड) यांनी दिलेल्या फिर्यादीत उज्वलाचा मानसिक छळ सुरू असल्यानेच तिने आत्महत्या केली असून तिच्या घरचे जबाबदार असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीवरून सासू गोदाबाई चंद्रकांत येजगर, सासरा चंद्रकांत सदाशिव येजगर, दीर योगेश चंद्रकांत येजगर आणि जाऊ अश्विनी योगेश येजगर (सर्व रा. सोनगाव, ता. फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

चार वर्षापूर्वी उज्वला आणि अनिल येजगर यांचे लग्न झाले होते. अनिल येजगर हे चालक असल्याने ते वारंवार घराच्या बाहेर असतात. याचाच फायदा घेवून गोदाबाई, चंद्रकांत, योगेश आणि अश्विनी हे उज्वलाचा लग्नात हुंडा दिला नाही व मानसन्मान दिला नाही. यावरून मानसिक छळ करत होते. तसेच नवीन गाडी खरेदीसाठी आणि अश्विनीचे गहाण दागिने सोडवण्यासाठी माहेरहून 1 लाख रूपये आणण्याचा तगादा लावला होता. तसेच 1 लाख रूपये आणल्यानंतरच वडिलोपार्जित जमिनीमध्ये हिस्सा देणार असल्याचे संशयितांनी उज्वलाला सांगितले होते. दि. 22 मे रोजी उज्ज्वलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे देविदास तुकाराम सदगर यांनी माहेरच्या नातेवाईकांना सांगितले.