फुलपाखरांनी बहरलेलं ‘हे’ उद्यान पर्यटकांना पाडतंय भुरळ; इथं एकदा तरी द्या नक्कीच भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पावसाळा ऋतू सुरु झाला कि निसर्गाचा सुंदर असा नजारा पहायला मिळतो. मग आपोआप ओठावर येतात ती गाणी पावसाची. हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने, मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे धूंद व्हा रे, असे गाणे आपण आपोआपच म्हणू लागतो. तुम्हालाही असे गाणे गुणगुणावेसे वाटत असेल आणि तेही फुलपाखरांसंगे तर मग तुमच्यासाठी पाटण तालुक्यातील भोसगाव या फुलपाखरू उद्यानाला नक्कीच भेट द्या.

सुमारे कोटीभराच्या निधीतून पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं फुलपाखरु उद्यान अन् निसर्ग पर्यटन केंद्र इथं उभारण्यात आलेले आहे. या याठिकाणी आल्यावर तुम्हाला छान किती दिसते, फुलपाखरू… या वेलीवर, फुलांबरोबर गोड किती हसते, फुलपाखरू… हे गाणं तुम्ही म्हंटल्याशिवाय राहणार नाही.

पाटण तालुका हा सह्याद्रीच्या कुशीत वसल्याने येथील भौगोलिक परिस्थितीही पर्यटनासाठी अनुकूल आहे. निसर्गाची वैविध्यपूर्ण रूपे ही पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. स्थानिक जैवविविधतेसाठी नैसर्गिक अधिवासास खूपच महत्त्व आहे. या ठिकाणी असलेल्या भोसगावच्या फुलपाखरू उद्यानात अनेक जातीची फुलपाखरे आहेत. सुमारे कोटीभराच्या निधीतून पश्चिम महाराष्ट्रातलं पहिलं वहिलं फुलपाखरु उद्यान अन् निसर्ग पर्यटन केंद्र या ठिकाणी झाल्याने इथे दरवर्षी हजारो पर्यटक, शाळेतील मुलाच्या सहली भेट देण्यासाठी येतात.

Butterfly Garden 02

साता-यापासून भोसगाव सुमारे पाऊणशे किलोमीटरवर आहे. आणि कराड इथून पश्चिमेस असलेल्या ढेबेवाडीकडे जावे लागते. या ठिकाणी भोसगाव येतं. या ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणात फुलपाखरू उद्यान उभारण्यात आलेल आहे. या ठिकाणी उद्यानाच्या माध्यमातून पर्यटक तसेच अभ्यासकांना पश्‍चिम घाटात आढळणारी फुलपाखरे पाहण्याची आणि अभ्यासण्याची संधी निर्माण झाली आहे.

Butterfly Garden

सर्व फुलपाखरांची माहिती

भोसगाव हे जसे फुलपाखरू उद्यानामुळे पसिद्ध आहे तसेच ते निसर्ग, विविध रंगाची फुले, वनस्पती यामुळेही प्रसिद्ध आहे. याठिकाणी फुलपाखरांचे जीवनक्रम तसेच पर्यटन स्थळं, विविध प्राणी, पक्षी, नैसर्गिक जैवसाखळी यांची इत्थंभूत माहिती सांगणारे फलक येथील माहिती केंद्रात उभारण्यात आलेले आहे. त्यामध्ये सर्व जातीच्या फुलपाखरूंची सर्व माहिती देण्यात आली आहे. त्याचसोबत या याठिकाणी ब्रिटिशकालीन वनविश्रामगृह, खानसमा निवास व भोजनकक्ष असा ऐतिहासिक ठेवाही पाहायला मिळतो.

Bhosgaon

मराठवाडी धरणासह निसर्गाचा देखणा नजारा

या फुलपाखरू उद्यानात विविध प्राणी व पक्ष्यांचे पुतळे देखील बांधण्यात आलेले आहेत. ते बालगोपालांचे विशेष आकर्षण ठरतात. येथील निसर्ग केंद्रातील पायऱ्या चढून थोडे पुढे गेल्यावर उंच टेकडी लागते. त्या टेकडीवरून पॅगोडातून मराठवाडी धरणासह देखणा निसर्गही पहायला मिळतो. प्रतिवर्षी ऑक्‍टोबरपासून डिसेंबरपर्यंत येथील फुलपाखरांची दुनिया बहरते. पावसाळ्याच्या तोंडावर या ठिकाणी वनविभागामार्फत फुलपाखरांना आकर्षित करणारी फुलझाडे व विविध प्रकारची रोपे देखील लावण्यात आलेली आहेत.

Butterfly Garden 02

राज्यभरात वेगळी ओळख

पाटण तालुक्याच्या अर्थ व्यवस्थेत इतर पर्यटन स्थळांबरोबरच भोसगावचे हे फुलपाखरू उद्यान पर्यटनाची महत्वाची भूमिका पार पाडते. यातून स्थानिकांनाही रोजगार उपलब्ध होतो. फुलपाखरू उद्यानामुळे पाटण तालुक्याची वेगळी ओळख राज्यभर होताना दिसत आहे.

Butterfly Garden 02

भोसगावमधील असणारी इतर ठिकाणे

भोसगाव येथील टेकडीवर ब्रिटिशकालीन डाकबंगला आहे. तो 1941 मध्ये बांधण्यात आला आहे. तत्कालीन स्थापत्यकलेची मोहोर तिथं उमटलेली दिसते. तिथंच बाजूला ‘आयएसओ’ मानांकन मिळवलेली जिल्हा परिषदेची देखणी शाळा आहे. केंद्राशेजारुन जाणारी डांबरी ‘बिकट’ वाट आपल्याला थेट आंब्रुळकरवाडीच्या डोंगरावर घेऊन जाते. तिथं वा-यावर डौलानं फडकणा-या पवनचक्क्या दिसतात. पर्यटकांसाठीच्या पॅगोडातून मराठवाडी धरणाचं विहंगम चित्र दिसतं.

अंतर किती आहे?

भोसगाव हे गाव महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. हे उपजिल्हा मुख्यालय पाटण पासून 36 किमी अंतरावर आणि सातारा जिल्हा मुख्यालयापासून 80 किमी अंतरावर आहे. भोसगाव हे गाव पाटण विधानसभा मतदारसंघ आणि सातारा लोकसभा मतदारसंघांतर्गत येते. कराड हे सर्व प्रमुख आर्थिक उपक्रमांसाठी भोसगावपासून जवळचे शहर आहे, जे अंदाजे 30 किमी अंतरावर आहे.