दुकानात वडापाव आणायला गेलेल्या 7 वर्षांच्या मुलीवर सिरीयल मोलेस्टरकडून लैंगिक अत्याचार

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईमधील घाटकोपर या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सात वर्षीय मुलीचं अपहरण करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले आहेत. याप्रकरणी तब्बल पाच वेळा महिला आणि लहान मुलींवर छेडछाड, अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सचिन अनंत शामा असे 35 वर्षीय आरोपी व्यक्तीचे नाव आहे.

काय आहे नेमका प्रकार?
घाटकोपरच्या आनंद नगर विभागात पीडित सात वर्षीय मुलगी वडापावच्या दुकानात आली होती. त्यावेळी आरोपी नराधमाने तिच्याशी गोडगोड बोलायला सुरुवात केली आणि तो तिला वडापावच्या दुकानापासून तब्बल एक ते दीड किलोमीटर दाट झाडी असलेल्या निर्मनुष्य ठिकाणी घेऊन गेला. त्या ठिकाणी त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेनंतर तिथून जाणाऱ्या नागरिकांनी मुलीला पाहिले आणि याची माहिती पोलिसांना आणि तिच्या नातेवाईकांना दिली. यानंतर पोलिसांनी लगेचच मुलीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांनी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक गुन्हा नोंदविला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी आठ पथकं तयार करून विभागातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. यामध्ये पोलिसांना आरोपीचा फोटो सापडला. त्यानंतर पोलिसांनी भिवंडी येथे सापळा रचून आरोपीला अटक केली आहे.

आरोपीची पार्श्वभूमी
आरोपी सचिन शामा हा घाटकोपर, साकीनाका, पार्कसाईट पोलीस ठाण्यात पाच अशाच प्रकारच्या गुन्ह्यात आरोपी असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हा आरोपी अशाच गुन्ह्यांमध्ये कोठडीत असून कोरोना काळात कोठडीतून बाहेर आला होता. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.