सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अॅथलेटिक्सचे मैदान गाजवले. 4 बाय 400 मीटर रिलेमध्ये मुलींनी सुवर्णपदक पटकावले. 200 मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आज पुन्हा सुवर्णपदक उंचावले. दुसरी स्पर्धेक अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने 200 मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले. मुलांचा रिले संघ अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकला नाही. हरियानाच्या संघाने विजेतेपदकाचा चषक मिळवला. मध्य प्रदेश आणि तामीळनाडूला अनुक्रमे उपविजेतेपद मिळाले.
मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. मुलींमध्ये हरियानाला चमक दाखवता आली नाही. तामिळनाडू आणि कर्नाटकच्या संघाला उपविजेतेपद मिळाले.
मुलींच्या रिलेच्या संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. 4 बाय 400 मीटरमध्ये 4. 02. 76 सेकंदाची वेळ नोंदवून सुवर्ण पदक पटकावून महाराष्ट्राची हरियानात मान उंचावली. यात 8 सुवर्ण, 3 रौप्य आणि एका कांस्य पदकाचा समावेश होता. सुदेष्णा शिवणकर आणि अवंतिक नरळे यांनी वैयक्तिक तीन-तीन पदके पटकावली. सुदेष्णाने 100 मीटर धावण्यात नोंदवलेली (11.79 सेकंद) वेळ तिचा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स आहे. तिने 200 मीटरमध्ये 24.29 सेकंदाची वेळ नोंदवली.
4 बाय 100 मीटर रिलेमध्येही मुलींच्या संघाने सुवर्णपदक घेतले आहे. त्यात साक्षी चव्हाण (औरंगाबाद), सुदेष्णा शिवणकर (सातारा), अवंतिका नरळे (पुणे), सिया सावंत (मुंबई) या खेळाडूंचा रिलेचा संघ होता. मंगळवारी यांच्या संघाने मैदान गाजवले होते.
दुखापतीतून पदकाकडे
मुलींच्या १०० मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.