अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर भाष्य केल्यानं ओवेसींविरोधात याचिका दाखल

नवी दिल्ली । एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अयोध्येतील रामजन्मभूमी प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर भाष्य केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. अँटिटेररिस्ट फ्रन्ट इंडिया या संघटनेचे अध्यक्ष विरेश शांडिल्य आणि एका वकिलाने मिळून ओवेसींविरोधात ही याचिका दाखल केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने याबाबत वृत्त दिले आहे.

ओवेसी यांनी सुप्रीम कोर्टाच्या प्रतिष्ठेला धक्का लावल्याचे आणि अपमान केल्याचे सांगत त्यांच्यावर कारवाईची मागणी याचिकेत केली आहे. याशिवाय हिंदुंच्या भावना दुखावत मुस्लिमांना भडकावणारं विधान केल्याचेही या याचिकेत म्हटलं गेलं आहे. ओवेसी यांनी ३० जुलै रोजी अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाआधी एका वृत्तवाहिनीवर सुप्रीम कोर्टाची पवित्रता आणि बुद्धिमत्तेबाबत अपमानजनक विधान केलं आहे. कोर्टाने निर्णय सुनावण्यापूर्वी राम मंदिराचा वाद मोठ्या काळापासून प्रलंबित होता. ओवेसींनी या वादाबाबत खोटे आणि निराधार विधान असल्याचे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटलं आहे.

ओवेसी यांनी केलेल्या या विधानामुळे प्रभू श्रीरामामध्ये आस्था असणाऱ्या करोडो भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. राष्ट्रीय वृत्त वाहिनीवर असं विधान करीत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्याप्रती अनादर व्यक्त केला केला.  सोबतच भारताच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नसल्याचेही त्यांनी यावेळी दाखवून दिल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like