झाडाला उलटं लटकवून तरुणाला काठीने बेदम मारहाण

रायपूर : वृत्तसंस्था – छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एक अजब प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या मारहाणीप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनासह पाच जणांना अटक केली आहे.

कुठे घडली हि घटना ?
हि मारहाणीची घटना बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन हद्दीतील उचाभट्टी गावामध्ये घडली आहे. यामध्ये एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 15 वर्षीय अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणी मनीष खरे, शिवराज खरे आणि जानू भार्गव यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली तर भीम केसरवाणी आणि एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाला आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
या घटनेतील पीडित महावीर हा सूर्यवंशी जिल्ह्यातील रतनपूर भागातील रहिवासी आहे. सिपत परिसरातील उचभट्टी गावात राहून तो मजूर आणि चौकीदार म्हणून काम करतो. हाती आलेल्या माहितीनुसार, 24-25 एप्रिलच्या मध्यरात्री मनीषने महावीरला घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. यावेळी महावीर पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी मनीषने त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पोलिसांच्या हवाली केले. मनीषने महावीरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळे पोलिसांनी महावीरला इशारा देऊन सोडून दिलं.

यानंतर मनीषने महावीरवर आरोप केला की बुधवारी रात्री महावीर पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि बाहेर पार्क केलेल्या त्याच्या मोटरसायकलचं नुकसान करून पळून गेला. गुरुवारी, मनीष आणि इतर चार आरोपींनी महावीरला पकडलं आणि कथितरित्या त्याला गावातील वीटभट्टीजवळील झाडाला उलटं टांगलं आणि त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.