औरंगाबाद – पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेदरम्यान मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून पेपर सोडविणाऱ्या परीक्षार्थींना उत्तरे सांगणाऱ्या औरंगाबाद शहर पोलिस दलातील पोलिस अंमलदारासह दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने अशा पद्धतीने तीन लेखी परीक्षेदरम्यान उत्तरे सांगितली असल्याचे पोलिस तपासातून निष्पन्न झाले आहे. राहुल उत्तम गायकवाड (वय 33, रा. मिलकॉर्नर, पोलिस वसाहत, औरंगाबाद) असे या अंमलदाराचे नाव आहे. त्याच्यासह गणेश रामभाऊ वैद्य (वय 25, रा. धोंदलगाव, वैजापूर, औरंगाबाद) याला देखील अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्यात यापूर्वी नितीन जगन्नाथ मिसाळ (वय २६) आणि रामेश्वर दादासाहेब शिंदे (वय 24, दोघेही रा. औरंगाबाद) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिस नाईक शशिकांत यशवंत देवकांत यांनी फिर्याद दिली आहे. 19 नोव्हेंबर 2021 रोजी हिंजवडी परिसरातील ब्लूरीज पब्लिक स्कूलमध्ये हा प्रकार उघडकीस आला होता. पोलिस भरती प्रक्रियेमध्ये लेखी परीक्षेदरम्यान मास्कमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्र बसवून परीक्षा देण्याचा प्रयत्न करत असताना मिसाळ आणि शिंदे यांना पकडण्यात आले, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक साधने पोलिसांनी जप्त केली आहेत.
गायकवाड आणि वैद्य यांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. गायकवाड याला कायद्याचे ज्ञान असतानाही त्याने हा गुन्हा केला आहे. तो याबाबतची माहिती त्वरित पोलिसांना देण्याची शक्यता कमी आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले इलेक्ट्रॉनिक यंत्र कुठून आणले याचा तपास करायचा आहे. तसेच अशा प्रकारचा गुन्हा करणारे रॅकेट कार्यरत आहे का, याचा छडा लावण्यासाठी आरोपींना दहा दिवस पोलिस कोठडी देण्याचा युक्तिवाद सरासरी वकील विजयसिंह जाधव यांनी केला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. जे. डोलारे यांनी 27 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.