सुरजागड खदानीविरोधातील आंदोलकांना पहाटे अटक; एटापल्ली पोलिसांची कारवाई

एटापल्ली : सुरजागड लोह खदानीवरुन गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. स्थानिक नागरिक आणि आदिवासी खदानीविरोधात रस्त्यावर उतरले असून खदानीला विरोध करत आहेत. आज 29 आॅक्टोंबर रोजी पहाटे 6 वाजेच्या दरम्यान खदानीविरोधात एटापल्ली येथे ठिय्या आंदोलनाला बसलेल्या प्रमुख नेत्यांना पोलिसांनी अचानक अटक केल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये जि.प. सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, शिला गोटा आदींचा समावेश आहे.

गडचिरोली येथील सुरजागड लोहखदान प्रकल्पाविरोधात स्थानिक नागरिक आणि आदिवासी यांनी एल्गार पुकारला आहे. 25 आॅक्टोबर रोजी तब्बल 10 हजार आदिवासींनी एकत्र येत एटापल्ली येथे मोर्चा काढून प्रशासनाला खदान बंद करण्याबाबत निवेदन दिले होते. त्यानंतर जोपर्यंत खदान बंद होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भुमिका घेत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरु केले. आज ठिय्या आंदोलनाचा तिसरा दिवस असताना पोलिसांनी कारवाई करत आंदोलकांना अटक केली आहे.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=262764625861797&id=100002531618549

दरम्यान, गडचिरोली जिल्ह्यात एकुण 25 लोहखाणी प्रस्तावित आहेत. यापैकी सुरजागड येथे खदान सुरु झाली असून स्थानिक नागरिकांनी त्याला जोरदार विरोध केला आहे. खदानीमुळे पहाड नष्ट होणार आहे. तसेच लाखो झाडे तोडली जाणार आहेत. याचा पर्यावरणावर मोठा परिणाम होऊन पर्जन्यमान कमी होऊन भुगर्भातील पाणी पातळीवरही त्याचा परिणाम होणार आहे. शेतीला याचा मोठा फटका बसणार आहे. भारतीय संविधान, पेसा कायदा, वनहक्क कायदा यांची पायमल्ली करुन दबावतंत्र वापरुन सुरजागड लोहखदान सुरु असल्याचा आरोप आंदोलक करत आहेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणार्‍यांना अटक झाल्याने आता गडचिरोली जिल्ह्यातील वातावरण अजूनच तापले आहे.