व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

पोलिसांची कमाल ! सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी लढवली ‘हि’ शक्कल

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – मुंबईतील मालाड पोलिसांनी दिवसाढवळ्या घरफोडी करून किमती ऐवज लंपास करणाऱ्या एका टोळीला अटक केली आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून टोळीतील पाच आरोपीना गजाआड केले आहे. या टोळीने काही दिवसांपूर्वीच मालाड येथील एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरात चोरी केली होती. यामध्ये या चोरटयांनी घरातील टीव्ही, लॅपटॉपसह अन्य मौल्यवान वस्तू असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल लुटला होता. यानंतर पोलिसांनी तातडीने आपली सूत्रे हलवली आणि पाच जणांना या प्रकरणी अटक केली.संबंधित सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत.

या आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी चक्क शक्कल लढवली. यासाठी पोलिसांनी रोमँटिक कपलचा वेश धारण केला. तर काही पोलीस रिक्षाचालक, वेटरच्या वेशभूषेत सापळा रचला. 31 जानेवारी रोजी 60 वर्षीय फिर्यादी महिलेचा वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त फिर्यादी महिला दुपारी एकच्या सुमारास मुंबादेवी आणि महालक्ष्मी मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. रात्री उशिरा घरी परतल्या असता त्यांच्या घराचं लॉक तुटल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यावेळी त्यांनी घरात जाऊन पाहाणी केली असता घरातील टीव्ही, लॉपटॉपसह सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने तसेच काही रोकड असा एकूण 40 लाखांचा मुद्देमाल चोरीला गेला होता.

यानंतर पीडित महिलेने लगेच मालाड पोलीस पोलीस ठाण्यात आरोपी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. तेव्हा एक संशयित टॅक्सी पोलिसांच्या निदर्शनास आली. पण गाडीचा नंबरप्लेट व्यवस्थित दिसत नव्हता. यानंतर पोलिसांनी काही टॅक्सीचालकांना विचारले असता संबंधित कॅब घाटकोपरमधील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.याठिकाणी पोलिसांनी आधीच सापळा रचला होता. यामध्ये एक पोलीस रिक्षाचालक, दुसरा वेटर तर अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी रोमॅंटीक कपलचा वेश घेतला होता. यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीने सद्दाम खान, अब्दुल पठाण आणि रॉनी फर्नांडिस, नौशाद खान आणि गुड्डू सोनी या पाच आरोपींना अटक केली. पोलिसांनी या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली टॅक्सी, चोरलेला टीव्ही सेट आणि 16.6 लाख रुपयांचे हिऱ्यांचे दागिने जप्त केले आहेत. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.