नशेच्या गोळ्या विक्री करण्याऱ्या एजन्सीला पोलीसांचा दणका

औरंगाबाद – पोलिस दलाचा वार्षिक अहवाल मांडताना मागील महिन्यांत खुद्द पोलिस आयुक्तांनीच नशेच्या आहारी जाणाऱ्या तरुणाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठकही घेतली होती. मात्र, त्यानंतरही नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्यांचे पेवच फुटले आहे. नुकतेच उस्मानपुरा पोलिसांनी एका आरोपीला नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणात अटक केली असून तो ज्या मेडिकल एजन्सीमध्ये काम करतो त्या एजन्सीचा थेट परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव अन्न व औषधी प्रशासन विभागाला दिला आहे.

याप्रकरणी निरीक्षक बागवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी रोजी प्रतापनगर मैदानाजवळ तौफिक रफिक फारोखी (41, रा. ब्रिजवाडी, नारेगाव) या आरोपीला पोलिसांनी नशेच्या गोळ्या विक्री प्रकरणी अटक केली आहे. आरोपी तौफिक हा ‘अनिल एजन्सी फार्मास्युटिकलचा डिस्ट्रीब्युटर असून त्याच्याकडे शेड्यूल एच-1 औषधींचा साठा सापडला होता. शेड्यूल एच-1 हे प्रिस्क्रिप्शन ड्रग प्रकारात मोडतात, ते मानवी शरीरास हानिकारक आहेत. विशेष म्हणजे शेड्यूल एच-1, प्रिस्क्रिप्शन संदर्भात पूर्ण जाणीव असूनही अनिल एजन्सीने कोणतीही काळजी न घेता औषधींचा पुरवठा केला आहे.

त्यामुळे अनिल एजन्सीचे परवानाधारक अंकुर गजेंद्र साहुजी, अनिल एजन्सी (गुलजार टॉकीज जवळ, गुलमंडी) यांचा परवाना रद्द करावा याबाबतचा प्रस्ताव निरीक्षक बागवडे यांनी सहायक आयुक्त अन्न औषध प्रशासन यांना दिला आहे. पुढील तपास आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त उस्मानपुरा विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक गीता बागवडे करत आहेत.