लाखोंचा माल पसार करणारा अटकेत पोलिसांची मध्य प्रदेशात जाऊन कारवाई

औरंगाबाद : मध्यप्रदेशातील कंपनीत पाठवलेला २३ लाख २८ हजार ३४७ रुपये किंमतीचा माल परस्पर लांबवून एका कंपनीला विक्री केल्या प्रकरणी पोलिसांनी एका व्यापाऱ्याला बुधवारी रात्री अटक केली आहे. हा माल चिकलठाणा येथून पाठवण्यात आला होता. अक्षय कमल मित्तल (रा. मौलाना आझाद मार्ग, सेधवा जि. बडवानी मध्यप्रदेश) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी गुरुवारी दिली आहे. चिकलठाणा एमएस डब्ल्युसी गोडावून येथून ४ मे रोजी फिरोज मनसोरी हमीद (रा. मोतीबाग मोहल्ला, बडवानी, मध्यप्रदेश) यांच्या ट्रक मधून २३ लाख २८ हजार ३४७ किंमतीचा कॉटन बेल्सचा माल मध्यप्रदेश येथील बुधनी येथे असलेल्या ट्राईडेंन्ट यारन कंपनीकडे पाठविला होता.

हा माल सदर कंपनीकडे न घेऊन जाता, ट्रक चालकाने परस्पर घेऊन पसार केला. या प्रकरणी निखील कमलकिशोर खंडेलवाल (रा. दत्त कॉलनी, अकोला) याच्या फिर्यादीवरून एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास केला असता, ट्रक चालक फिरोज हमीद याने मध्यप्रदेशातील बन्सी प्रेसजवळील एका मैदानात सदरील माल खाली केल्याची माहिती प्रेस मधील हमालाने दिली.

तसेच गुन्ह्यातील माल मुख्य आरोपी तथा कंपनीचा मालक अर्पित बनवारीलाल गर्ग याने सुखराम याच्या ट्रकमध्ये (क्रं. एमएच-१८ बीए-८५०५) मध्ये लोड करुन तो इंदूर येथे अक्षय मित्तल याला दिला. त्याने श्री. फायबर्सच्या नावे बील बनवून फसवूक केली. आरोपी अक्षय मित्तल याला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयात सहायक सरकारी वकील एस. आर. ढोकरट यांनी युक्तीवाद केला. आरोपीने डोडवे याचा गुन्ह्यात वापलेला ट्रक जप्त करणे आहे. गुन्ह्यातील मुख्य आरोपी गर्ग याला अटक करणे आहे. तपास करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

You might also like