व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर आत्महत्या करण्याची पोस्ट टाकत पोलीस कर्मचारी बेपत्ता

जालना : व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर मी आत्महत्या करत असल्याची माहिती देत एक पोलीस कर्मचारी गायब झाल्याची घटना घडली आहे. वरिष्ठांच्या छळाला कंटाळून आत्महत्या करत असल्याची पोस्ट या कर्मचाऱ्याने केली होती. या घटनेनंतर त्यांनी मोबाईल बंद करून ठेवल्यामुळे पोलिस दलात गोंधळ उडाला आहे. याप्रकरणी पोलिस या कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. या सुसाईड नोट मध्ये त्या कर्मचाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे या व्हाट्सअप पोस्ट मधील नोट मध्ये लिहिलेले आहे.

जालन्यातील उखळी गावात गावठी दारूच्या दुकानावर कारवाई करण्यात आली होती. ही कारवाई एका पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आरोपी आणि त्याच्या पत्नीने पोलीस ठाण्यात जाऊन या पोलीस कर्मचाऱ्यासोबत भांडून शिवीगाळ करत इतकेच त्याला धमकी सुद्धा दिली होती.‘माझ्या मृत्याला संबंधित प्रभारी पोलिस अधिकारी, माझ्या विरोधात तक्रार करणारे पती-पत्नी जबादार असून, त्याची सर्व माहिती माझ्या पत्नीला द्यावी,’ असे या व्हाट्सअँप पोस्टमध्ये नमूद केले आहे.

यामुळे या पोलीस कर्मचाऱ्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे. आपण प्रभारी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत आहोत, असे त्याने सुसाईड नोटमध्ये लिहून ती पोस्ट पोलीस ठाण्याच्या व्हाट्सअ‍ॅप ग्रुपवर शेअर केली. त्यानंतर दुपारपासून मोबाइल बंद करून हा पोलीस कर्मचारी गायब झाला आहे.

You might also like