कोल्हापूर प्रतिनिधी । जिल्ह्यातील १६ खासगी सावकारांच्या घरावर गुरुवारी दिनांक १२ रोजी सकाळी पोलसांनी छापे टाकले. या कारवाईने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. तर जिल्ह्यातील इतर सावकारांचे मात्र धाबे दणाणले आहेत. हि कारवाई पुढील तीन दिवस सुरू राहणार असल्याची चर्चा संपूर्ण जिल्हाभर सुरु आहे.
कोल्हापूर शहरातील राजारामपुरी बारावी गल्ली, उद्यमनगरातील नारायण जाधव आणि त्यांचा मुलगा तुळशीदास जाधव यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी घरातील कागदपत्रांची तपासणी केली. त्यामध्ये बँक पासबुक, कराराची कागदपत्रे, संपत्तीचे दस्त अधिकाऱ्यांना मिळाले आहेत. त्याशिवाय कोरे स्टँपेपर आणि सह्या केलेले चेक मिळाल्याची चर्चा आहे.
खासगी सावकारांविरोधात पोलीस प्रशासनाकडून कारवाई सुरू असली तरी सहकार खात्याकडून कारवाई व्हावी, अशी मागणी पुढे येत होते. सावकारीखाली दबलेल्या नागरिकांनी पोलीस, सहकार विभागासह राज्य सरकारकडे तक्रारी केल्यानंतर आज कारवाई करण्यात आली. सकाळच्या सुमारास मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील जिल्हा निबंधक कार्यालयाजवळ १००हून अधिक पोलिस जमा झाले होते. सावकार घरातून बाहेर पडण्यापूर्वी पोलिसांच्या सरंक्षणाखाली सहकार खात्याने सावकारांच्या घरावर छापे टाकले.