उंब्रज पोलिसात पोलिसांची तक्रार : म्हैशी परस्पर दिल्याने गो-शाळा प्रमुखावर गुन्हा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | घोलपवाडी (ता.कराड) गोशाळेत ठेवण्यासाठी दिलेल्या म्हैशी परस्पर दुसऱ्याला देऊन विश्वासघात केल्याप्रकरणी भगवान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट गोशाळेचे प्रमुख संजय शहा यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यासंदर्भात बोरगाव पोलिसांच्या वतीने पो. ना. किरण प्रकाश निकम यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ट्रकमध्ये चारा पाण्याची सुविधा न करता 15 म्हैशींना दाटीवाटीने बांधलेले होते. त्यामुळे बोरगाव पोलिसांनी अरबाज मुनेर मुल्ला, अमर हाजी शेख (दोघे रा. इचलकरंजी) यांच्यावर गुन्हा दाखल करून म्हैशी व ट्रक ताब्यात घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी संजय शहा (रा. कराड) यांना म्हैशी तुमच्या गोशाळेत ठेवायच्या आहेत असे सांगितले. तेव्हा संजय शहा यांनी पोलिसांना सांगितले की तुम्ही आमचे ट्रस्टच्या नावे पत्र द्या व म्हैशी तिथे जमा करा. त्यामुळे पोलिसांनी सदरच्या म्हैशी संजय शहा यांच्या घोलपवाडी येथील भगवान महावीर चॅरीटेबल ट्रस्ट या गोशाळेत कामगार योगेश भरत घोलप यांचेकडे विश्वासाने ताब्यात दिल्या. काही दिवसांनी एक म्हैस मयत झाली. त्यानंतर सदर गुन्ह्याचे न्यायालयात दोषारोपपत्र पाठवण्यात आले. दरम्यानच्या काळात संजय शहा यांनी त्यांच्या गोशाळेतील हयात असलेल्या 14 म्हैशींचा दररोजचा खर्च चारशे रुपये प्रमाणे मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला.

त्याप्रमाणे न्यायालयाने शहा यांचा अर्ज मान्य करत म्हैशीचे मालक सुलतान जमील सौदागर (रा. कोरेगाव) यांना खर्च देण्याचा आदेश दिले. त्यानंतर सुलतान सौदागर यांनी सातारा येथील सत्र न्यायालयात म्हैशी ताब्यात मिळण्याकरता अर्ज केला. त्याप्रमाणे न्यायालयाने सौदागर यांना म्हैशी परत देण्याचा आदेश दिला. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सौदागर यांना म्हैशी ताब्यात देण्याकरिता बोरगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घोलपवाडी येथे ट्रस्टमध्ये गेले. तिथून त्यांनी ट्रस्टचे प्रमुख संजय शहा यांना फोन करून 14 म्हैशी देण्याची मागणी केली असता त्यांनी म्हैशी देण्यास विरोध केला.

त्यानंतर दादासो घाडगे यांनी पोलिसांना गोशाळा उघडून दाखवली त्यावेळी तेथे म्हैशी नसल्याचे आढळून आले. त्यामुळे सपोनि वाघ यांनी संजय शहा यांना विचारले असता त्यांनी म्हैशी शेतकऱ्यांना तशाच दिल्याचे सांगितले. अधिक तपास सपोनि अजय गोरड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पाटील करीत आहेत.

Leave a Comment