पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देत पोलिसाने महिलेसोबत केले ‘हे’ कृत्य

रायगड : हॅलो महाराष्ट्र – अलिबागमध्ये पोलिसांच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी घटना घडली आहे. यामध्ये अलिबाग जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने विवाहित महिलेवर बलात्कार केला आहे. या आरोपी पोलिसाला पेण पोलिसांनी अटक केली आहे. शाम जाधव असे आरोपी हवालदाराचे नाव आहे. हा आरोपी पोलीस हवालदार गेल्या सहा वर्षांपासून पती आणि मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन या पीडित महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता. शाम जाधव यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता चार जानेवारी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. हि पीडित महिला पेण पोलीस ठाण्यात जाधव विरोधात तक्रार दाखल करायला गेली असता पोलीस कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ करून तिला मारहाणही केली. याबाबतसुद्धा जाधव यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अलिबाग येथील जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेला पोलीस हवालदार शाम जाधव याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहित महिलेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन 2015 पासून आज पर्यंत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. या प्रकरणी पीडित महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री तक्रार दाखल केली. त्यानुसार पेण पोलीस ठाण्यात आरोपी पोलीस शाम जाधव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर पोलिसांनी आरोपी शाम जाधव याला अटक केली असून त्याला चार जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी पोलीसाची सहकाऱ्यांनाच दमबाजी आणि मारहाण
पीडित महिलेने आरोपी शाम जाधव याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता या महिलेची फिर्याद ऐकून घेत असताना आरोपी शाम जाधव याने पेण पोलीस ठाण्यात गोधळ घातला. यावेळी आरोपीने ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उप निरीक्षक घाडगे यांना शिवीगाळ केली. तसेच ड्युटीवर असलेले पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांना देखील आरोपीने शिवीगाळ करुन हाताबुक्क्याने मारहाण केली. आरोपी शाम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यासाठी आलेले पोलीस शिपाई जाधव याना शामने शिवीगाळ करुन लाथेने मारहाण केली व गुजराथी यांच्या कानाखाली मारली. या प्रकरणीसुद्धा आरोपी शाम विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पेण पोलिस पोलिस निरिक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.