बीड जिल्हा रुग्णालयातील सलाईनमध्ये आढळले ‘शेवाळ’; माणसांवर उपचार करता की जलचरांवर?, नागरिकांचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड,प्रतिनिधी, नितीन चव्हाण : शासकीय रुग्णालय म्हटले की मनामध्ये संशयाचा कल्लोळच निर्माण होतो. परंतू काही वेळेस हा संशय खरा देखील ठरतो. येथील जिल्हा रुग्णालयातील नेत्रविभागामध्ये चक्क सलाईनच्या बाटलीतच शेवाळ आढळून आल्याची घटना घडली आहे. रुग्णालयातील परिचारिका व कर्मचार्‍यांच्या सतर्कतेमुळे मोठा धोका टळला आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील बंद सलाईनमध्ये शेवाळ आले कुठून, येथे माणसांवरच उपचार केले जातात की जलचरावर असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

राज्यपातळीवर शासकीय खरेदी करून रुग्णालयांना हे सलाईन पाठविण्यात आले आहे. डेनिस केम लॅब या उत्पादक कंपनीचे हे सलाईन 1807017142 या क्रमांकाच्या बॅचचे आहे. सप्टेंबर 2020 मध्ये या सलाईनची मुदत संपणार आहे. या बाटतील द्रवामध्ये मोठ्या प्रमाणावर शेवाळाचे घोष आढळून आले. पूर्णतः निर्जंतुकीकरण करून तयार केलेल्या या बाटलीत शेवाळ तयार कसे झाले? हा मोठा प्रश्‍न आहे. उत्पादक कंपनीने पॅकिंग करताना काळजी घेतली नाही की निर्जंतुकीकरणच केले नाही? अगोदरच शासकीय पुरवठ्यांबाबत असे प्रकार घडत असल्याने सरकारी रुग्णालयांतील गोळ्या-औषधी घेण्यास रुग्णांच्या नातेवाईकांकडून टाळाटाळ केली जाते. त्यातच आता चक्क बाटलीत शेवाळ आढळल्याने रुग्णांचा विश्वास तरी कसा ठेवायचा असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सतर्कतेमुळे धोका टळला असला तरी असा घातक पदार्थ रुग्णाच्या शरीरात जाणे मोठ्या धोक्याचे ठरू शकते. दरम्यान, सलाईन हे थेट नसेतून रक्तात जाते. त्यामुळे असे दूषित घटक रक्तात गेल्यानंतर पायोजेनिक इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन होऊ शकते. रुग्णाला इनाथायलाईटिक शॉक बसू शकतो. 2016 मध्ये हैदराबाद येथे असा प्रकार घडला होता. डोळ्यांबाबतीत तर हे अतिघातक आहे. याच विभागाती काही वर्षांपूर्वी नेत्रशस्त्रक्रियेदरम्यान रुग्णांना इन्फेक्शन झाल्याचे प्रकरण राज्यभर गाजले. मात्र, शस्त्रक्रियेसाठी 50 प्रकारच्या वस्तू वापराव्या लागतात. त्यात असा दूषित घटक मिश्रित वस्तू आल्याने असे प्रकार घडले जातात परंतु त्याचे खापर शस्त्रक्रिया करणार्‍यां डॉक्टरांवर फोडले जाते. असे असले तरीही सलाईनमध्ये शेवाळ आढळणे ही गंभीर बाब असून याकडे जिल्हा शल्यचिकित्सक यात विशेष लक्ष घालून राज्य शासनाच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांतून बोलले जात आहे.

असाच पुरवठा सुरू ठेवणार का?

शासनाच्या विविध पुरवठ्यांमध्ये मोठमोठे कंत्राटदार आणि उत्पादकांची साखळीच असते.  रुग्णालयांसाठी पुरवठा करणार्‍या औषधी व तत्सम वस्तू पुरवठ्यांबाबत सरकारने आणि संबंधित यंत्रणांनी सतर्क राहणे गरजेचे असते. असा प्रकार थेट रुग्णाच्या जिवावर उठू शकतात. ज्या कंपनीच्या बाटलीत हे शेवाळ आढळून आले आहे.त्याबाबत आता सरकार काय निर्णय घेणार? हे पाहावे लागणार असून यापुढेही असाच पुरवठा सुरू ठेवणार आहे की का? असा प्रश्‍न उपस्थित केले जात आहे.

जिल्हा रुग्णालयाला शासनाकडून ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून औषध पुरवठा केला जातो. ट्रान्सपोर्ट दरम्यान एखादी सलाईनची बॉटल डॅमेज झाली असेल त्यामुळे त्यात शेवाळ होऊ शकते. परंतु आपल्याकडून रुग्णांना उपचार देण्यापूर्वी संपूर्ण औषधांची तपासणी करूनच दिले जाते.
-डॉ. सुखदेव राठोड
अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

Leave a Comment