राज्यपालांनी काही शब्द टाळायला पाहिजे होते ; राज्यपालांच्या पत्रावर अमित शाह नाराज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी राज्यात मंदिरं उघडण्याची मागणी करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहुन उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. राज्यपालांच्या या पत्राबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यपालांना त्यांच्या पत्रात काही शब्द टाळता आले असते, असं शहा यांनी म्हटलं आहे. नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीत शहांनी यावर भाष्य केलं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मंदिरं खुली करण्याच्या मागणीसंदर्भात एक पत्र लिहिलं. त्यात कोश्यारींनी मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिली. ‘मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच तुम्ही अयोध्येचा दौरा केला होता. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची पूजा केली होती,’ असं कोश्यारींनी पत्रात म्हटलं. तुम्ही स्वत:ला रामभक्त, हिंदुत्ववादी म्हणवता. मग आता तुम्हाला मंदिरं खुली करण्यासाठी काही दैवी संकेत मिळत आहेत का, असा खोचक प्रश्न राज्यपालांनी उपस्थित केला. तुम्हाला सेक्युलर शब्दाचा तिटकारा होता. मग आता तुम्ही अचानक सेक्युलर झालात का?, असाही प्रश्न राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना विचारला होता.

राज्यपालांच्या या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संयमी पण तेवढेच खरमरती उत्तर दिले. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात वापरलेल्या शब्दांवर अनेकांनी आक्षेप नोंदवला. गृहमंत्री अमित शहांनीदेखील राज्यपालांच्या पत्रातील भाषेबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘राज्यपाल कोश्यारींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लिहिलेलं पत्र मी वाचलं. त्यांनी भाषणात काही संदर्भ दिले. पण त्यांनी काही शब्दांची निवड केली नसती, तर बरं झालं असतं, असं मलादेखील वाटतं. राज्यपालांनी ते विशेष शब्द वापरायला नको होते. त्या शब्दांची निवड टाळायला हवी होती,’ असं शहा म्हणाले.

यापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांच्या या पत्रावर आक्षेप घेताना यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment