पंकजा मुंडेंसह ‘या’ नेत्यांची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (j.p. nadda) यांच्या नेतृत्वाखालील भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी लवकरच जाहीर होणार आहे. त्यात राज्यातील ४ नेत्यांचा समावेश होणार असून या नव्या कार्यकारिणीत पंकजा मुंडे (pankaja munde), आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. २० जानेवारी रोजी जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती. नव्या अध्यक्षाबरोबरच नवी कार्यकारिणी जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे ही कार्यकारिणी लांबली होती. मात्र, येत्या ८ ते १० दिवसात ही नवी कार्याकारिणी अस्तित्वात येण्यार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

दिल्लीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे, आशिष शेलार, विनोद तावडे आणि संभाजी निलंगेकर-पाटील या महाराष्ट्रातील ४ नेत्यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच माजी मंत्री हंसराज अहिर यांनाही राष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजप नेते देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत असून भाजपच्या संसदीय कार्य समितीत त्यांची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान मिळणार नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. खडसे यांनी आधीच राष्ट्रीय राजकारणात रस नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर कोणतीही जबाबदारी दिली जाणार नसल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

पंकजा मुंडे सोबत या नेत्यांना राज्य कार्यकारिणीत स्थान नव्हतं मिळालं
पंकजा मुंडे यांना भाजपच्या राज्य कार्यकारिणीत स्थान देण्यात आले नव्हते. त्यांची राष्ट्रीय कार्यकारिणीत वर्णी लागणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे मुंडे यांची राष्ट्रीय कार्यकारिणीवर वर्णी लागण्याच्या शक्यतेला अधिक बळ मिळालं आहे. मात्र पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावर कोणती जबाबदारी देण्यात येणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, विनोद तावडे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यात आली नव्हती. तसेच राज्याच्या कार्यकारिणीतही त्यांना महत्त्वाचं स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, राष्ट्रीय स्तरावर त्यांच्याकडे कोणती जबाबदारी मिळणार? याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. तर आशिष शेलार यांना मात्र राष्ट्रीय कार्यकारिणीत अत्यंत महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment