नुकसान १ लाख कोटींचं मदत १ हजार कोटींची; मोदींच्या पॅकेजवर ममता संतापल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोलकाता । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अम्फान महाचक्रीवादळानं प्रचंड तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याचं सांगत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवरचा आपला राग व्यक्त केला. अम्फान महाचक्रीवादळाचा तडाखा झेललेल्या पश्चिम बंगालची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हवाई पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या.

या हवाई दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालसाठी १ हजार कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. परंतु, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारविरुद्ध आपली नाराजी व्यक्त केलीय. नुकसान १ लाख कोटींचं झालेलं असताना मदत म्हणून फक्त १ हजार कोटी दिले जात आहेत, असं म्हणत त्यांनी आपला राग व्यक्त केला.

‘मोदींनी आपात्कालीन आर्थिक मदत म्हणून १ हजार कोटी रुपयांची घोषणा केली. पण, हे पैसे कधी आणि कोणत्या स्वरुपात मिळणार याची स्पष्ट माहितीच देण्यात आलेली नाही. आम्ही याविषयी नंतर ठरवू असं ते म्हणाले’, असं ममता म्हणाल्या. मोदींना किती निधी द्यायचा आहे ते त्यांचे ते ठरवतील, आम्ही सर्व माहिती त्यांना देणार या शब्दांतच त्या व्यक्त झाल्या. ५६ हजार कोटी रुपये तर आमचेच केंद्राकडे थकित आहेत, असंही ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटलं.

दरम्यान, शुक्रवारी सकाळच्या वेळेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये अम्फान या महाचक्रीवादळामुळे ८० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय या वादळामुळे राज्याचं सुमारे १ लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. आता या साऱ्यामध्ये पंतप्रधानांची मदत कितपत फायद्याची ठरणार आणि ती मदत नेमकी राज्याला कोणत्या स्वरुपात मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment