भाजपच्या राजकीय जिहादाचे काय ??? मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील ठाकरे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’मध्ये खणखणीत आणि रोखठोक मुलाखत दिली. राज्यातील आणि देशातील काही महत्त्वाच्या प्रश्नांवर भाष्य करतानाच विरोधकांना त्यांनी या मुलाखतीतून फैलावर घेतलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी लव्ह जिहाद वरही भाष्य केले. मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली? असा थेट सवाल त्यांनी भाजपला केलाय.

संजय राऊत यांनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. “लव्ह जिहादचा एक नवीन विषय समोर आलाय…,” असं राऊत म्हणाले. “लव्ह जिहाद राजकारणात का नसावं? लव्ह जिहादचं राजकारण हा भाग वेगळा.. पण लव्ह जिहाद म्हणजे काय? मुस्लीम युवकाने हिंदू युवतीशी लग्न करायचं याला त्यांचा विरोध आहे. मग तुमची मेहबुबा मुफ्तीसोबत युती कशी चालली? नितीशकुमारांबरोबर कशी चालली? चंद्राबाबूंसोबत कशी चालली? ज्या ज्या युत्या तुम्ही केल्या… त्यात भिन्न विचारांचे पक्ष तुम्ही एकत्र येऊन युती चालते हे लव्ह जिहाद नाही? आहेच ना?. गोध्रा दंगलीनंतर रामविलास पासवान यांनी मोदींवर टीका करून केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता… त्यांना तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात. हे राजकीय लव्ह जिहाद नाही? आणि वापरून पुन्हा सोडून देणं… म्हणजे तलाक केलाच ना तुम्ही राजकारणातसुद्धा!,” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

सोयीचं हिंदुत्व आम्ही नाही केलं… जे शिवसेनाप्रमुखांनी सांगितलं, जनतेच्या हिताचं असेल ते कर… मग ते आपल्याला गैरसोयीचं असलं तरी जनतेसाठी कर! राजकारणासाठी तुम्ही हिंदुत्व नका घेऊ,” असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment