कोरोना काळात ‘हा’ एकमेव धंदा ठाकरे सरकारने चालवला आहे; फडणवीसांचा गंभीर आरोप

नागपूर । कोरोना विषाणू प्रादुर्भावच्या मुद्यावरुन भाजप पुन्हा आक्रमक झाले आहे. राज्यातील ठाकरे सरकार केवळ बदल्या करण्यात व्यस्त आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर केला आहे. कोरोनाबाबत सरकार गंभीर नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला. बदल्या केल्या नसत्या तरी चालले असते. सर्व मंत्री, प्रशासन बदल्यांमध्ये गुंतले आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. विदर्भातील पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले कि, “संपूर्ण शासन फक्त बदल्यांच्या मागे लागलं आहे. बदल्या करणं हा एकमेव धंदा शासनात चालला आहे. बदल्या महत्त्वाच्या आहेत पण एखाद्या वर्षी नाही केल्या म्हणून काही फरक पडत नाही. बदल्यांचा एका वर्षाचा खर्च ५०० कोटींच्या घरात जातो. करोना संकट असताना या बदल्या केल्या नसत्या तरी चाललं असतं. पण मंत्री, प्रशासन सगळेजण कोणाला कशी पोस्टिंग मिळणार, कुठे बदली होणार यात गुंग आहेत,” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

“बदल्या दरवर्षी होत असतात पण आमच्या काळात करोना नव्हता. जर आमच्या काळात करोना असता आणि बदल्या झाल्या असत्या तर बोट दाखवता आलं असतं. बदल्यांचा भत्ता देण्यासाठी ५०० कोटी लागतात. येथे पगार देण्यासाठी पैसे नाही आणि मग बदल्या कशाला सुरु आहेत?,” अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली. पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर बोलताना फडणवीस म्हणाले कि, “गंभीर परिस्थिती असून मी देखील त्याची माहिती घेतली. तरुण पत्रकाराचा अशा पद्दतीने मृत्यू होणं अंतर्मुख करणारं आहे. याकडे तात्काळ लक्ष दिलं पाहिजे”.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook