‘कोरोना चाचण्या वाढू नयेत यासाठी गृहमंत्रालय दबाव टाकतेय’; दिल्लीच्या आरोग्यमंत्र्याचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । राष्ट्रीय राजधानी दिल्लीत करोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढलेली दिसून येतेय. याच दरम्यान आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना एक पत्र लिहिलंय. दिल्ली सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश देऊनही केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दबावामुळे त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी केला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोनाच्या चाचण्यांची संख्या दुप्पट करण्याचे आदेश दिले होते. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दबावामुळे सरकारी अधिकारी या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात टाळाटाळ करत आहे, असं जैन यांनी पत्रात म्हटलं आहे. या पत्रानंतर गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण दिले असून निदान आतातरी दिल्लीतील कोरोना चाचण्यांची संख्या दुप्पट होईल, अशी आशा सत्येंद्र जैन यांनी व्यक्त केली.

तसेच सत्येंद्र जैन यांनी गृहमंत्री अमित शाह यांनाही टोला लगावला. केंद्रीय गृहमंत्रालयाने दिल्लीतील परिस्थिती हाताळण्यापेक्षा प्रथम गुजरात, उत्तर प्रदेश आणि देशातील इतर राज्यांकडे लक्ष द्यावे. दिल्लीत निवडूण आलेलं सरकार आहे आणि हे सरकार आपल्या जनतेसाठी निर्णय घेण्यात सक्षम आहे. असं असतानाही दिल्लीत करोना चाचण्या करण्यासाठी अरविंद केजरीवाल सरकारला का रोखलं जातंय? असा प्रश्न विचारत दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी गृह सचिव अजय भल्ला यांना पत्र लिहिलंय. दिल्लीच्या अधिकाऱ्यांवर या पद्धतीनं असंविधानिक आणि बेकायदेशीर दबाव का टाकला जातोय? तुम्हाला विनंती करतो की अशा पद्धतीचा दबाव टाकला जाऊ नये, असं जैन यांनी आपल्या पत्रात लिहिलंय.

दिल्ली सरकार दिल्लीमध्ये करोना चाचण्यांची संख्या वाढवत आहे. केंद्र सरकारनं यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. मी हे पत्र माननीय गृह मंत्री अमित शहा यांना लिहिणार होतो, परंतु त्यांची तब्येत बरी नसल्यानं आणि ते एम्समध्ये दाखल असल्यानं मी हे पत्र तुम्हाला लिहितोय, असंही आरोग्यमंत्र्यांनी गृह सचिवांना उद्देशून म्हटलंय. पत्रात केलेल्या उल्लेखानुसार, दिल्लीमध्ये वाढत्या करोना संक्रमणादरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी २६ ऑगस्ट रोजी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत प्रत्येक दिवशी होणाऱ्या २०,००० टेस्ट वाढवून ४०,००० हजारांपर्यंत नेण्याचा आदेश दिलाय.

दरम्यान, केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारमध्ये आतापर्यंत अधिकाराच्या मुद्द्यावरून अनेकदा वाद झाले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीवरूनही केंद्र सरकार आणि दिल्ली सरकारमध्ये खटके उडाले होते. मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आयोजित केलेल्या आढावा बैठकीला मुख्यमंत्री केजरीवाल उपस्थित राहिले नव्हते. यानंतर दिल्लीतील सरकारी रुग्णालयांमध्ये केवळ स्थानिक नागरिकांनाच उपचार देण्याचा आप सरकारचा निर्णय नायब राज्यपालांनी परस्पर फिरवला होता. यावरुनही बराच गदारोळ झाला होता. यानंतर आता पुन्हा एकदा केंद्र व दिल्ली सरकार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment