फडणवीस राजभवनातच एक रूम का नाही घेत? हसन मुश्रिफांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारविरोधात राज्यपालांकडे वारंवार तक्रारी घेऊन राजभवनावर जाणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जोरदार टोला हाणला आहे. ‘फडणवीस यांना मलबार हिलवरून राजभवनावर जायला वेळ लागतो. त्यामुळं त्यांनी राजभवनावरच एखादी रूम घ्यावी,’ असा उपरोधिक सल्ला मुश्रीफ यांनी फडणवीसांना दिला आहे. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले मुश्रीफ आज जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी आले होते. त्यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांच्यावर टीका केली.

मागील काही दिवसांपासून फडणवीस वारंवार राजभवनवर हजेरी लावून राज्यपालांशी चर्चा करत आहेत. राज्यपालांकडे राज्य सरकारच्या तक्रारी करत आहेत. मंगळवारी देखील फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नेत्यांनी राजभवनावर राज्यपालांची भेट घेऊन कोरोनाची परिस्थिती हाताळायला राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी राज्यपालांनी बैठक बोलावली. त्यावरून उलटसुलट चर्चा रंगली होती. त्याच पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे.

फक्त राजकारणापायी केंद्र सरकारनं लॉकडाऊन उशिरा लागू केलं
‘मध्य प्रदेशातील राजकारणापायी केंद्र सरकारनं देशातील लॉकडाऊन लांबवलं. राज्य सरकारनं धोका ओळखून अधिवेशन गुंडाळलं. मात्र, लोकसभेचं अधिवेशन सुरूच होतं. या काळात सुमारे ३५ लाख लोक विमानानं भारतात आले. ते मुंबई, दिल्ली, अहमदाबाद अशा सर्वच ठिकाणी गेले. त्या ३५ लाख लोकांना वेळीच क्वारंटाइन केलं असतं तर १३५ कोटी लोकांना घरात बसावं लागलं नसतं,’ असं मुश्रीफ म्हणाले.

भाजप सदस्यांना निधी दिला जाईल, पण त्याचे प्रमाण थोडे कमी असेल
ग्रामविकास विभागाचा निधी देताना भाजपच्या सदस्यांना कमी निधी दिल्याचा आरोप होत असल्याबद्दल मुश्रीफ म्हणाले ‘गेल्या पाच वर्षांत हे आम्ही भाजपकडूनच शिकलो आहोत. त्यांचंच अनुकरण आम्ही करत आहोत. माजी अर्थमंत्री व ग्रामविकास मंत्र्यांच्या मतदारसंघातील आकडे पाहिले तर ते स्पष्ट होईल. भाजप सदस्यांना निधी दिला जाईल, पण त्याचे प्रमाण थोडे कमी असेल. झुकतं माप आघाडीच्या सदस्यांनाच राहील’ असं मुश्रीफ म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment