वाढीव वीज बिलाचा एकनाथ खडसेंनाही बसला ‘शॉक’; महावितरणने पाठवलं १ लाख ४ हजार रुपयांचं बिल

जळगाव । महावितरणने वीज ग्राहकांना पाठवलेल्या वाढीव वीज बिलाचा ‘शॉक’ राजकीय नेत्यांना सुद्धा बसला आहे. भाजपा नेते एकनाथ खडसे यांना जळगावमधील मुक्ताईनगर येथील घरासाठी १ लाख ४ हजार रुपयांचं बिल पाठवण्यात आलं आहे. एप्रिल ते जुलै अशा ४ महिन्यांचं हे बिल आहे. एकनाथ खडसे यांनी वापर कमी असूनही इतकं वीज बिल आल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशी करावी तसंच बिलात सूट दिली गेली पाहिजे अशी मागणीही एकनाथ खडसे यांनी केली आहे.

एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “लॉकडाउनच्या या काळात येणारी वीज बिलं अवास्तव असून ती न भरण्यासारखी आहेत. महावितरणने अशा पद्दतीने लोकांना वेठीस धरु नये”. “सरकारने अवास्तव बिलांची चौकशी केली पाहिजे. तसंच बिलामध्ये सवलत दिली पाहिजे,” अशी मागणी एकनाथ खडसे यांनी यावेळी केली आहे.

लॉकडाननंतर आलेल्या वाढीव वीज बिलात सवलत देण्याचे आदेश आपण देऊ शकत नाही, असं उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केलं. तसंच ग्राहकांनी याप्रकरणी तक्रार निवारण मंचाकडे दाद मागण्याच्या आपल्या निर्देशांचा पुनरूच्चार केला. ग्राहकांच्या तक्रारींवर विलंब न करता तातडीने निर्णय देण्याचं आदेशही मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठाने वीज नियामक मंडळ तसेच वीजपुरवठादार कंपन्यांना दिले.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊनमध्ये सर्व काही ठप्प झाल्याने वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनीही प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन मीटर रिडींग बंद केले होते. या काळात मागील तीन महिन्यांच्या बिलाची सरासरी काढून त्यानुसार ग्राहकांना बिल पाठवण्यात आलं होतं. राज्य वीज नियामक आयोगाच्या सूचनेनुसारच कंपन्यांनी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे ग्राहकांना एप्रिल व मे महिन्यात आलेले वीज बिल हे जानेवारी, फेब्रुवारी व मार्चच्या बिलाच्या रकमेच्या सरासरीवर आधारीत होते. या तीनही महिन्यात उकाडा तुलनेनं कमी होता. मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत शाळा, कॉलेज व कार्यालये सुरू असल्यानं लोक नित्यनेमानं घराबाहेर पडत होते. साहजिकच या ३ महिन्यात विजेचा वापर कमी होता. परिणामी बिलाचा आकडाही कमी होता.

एप्रिलपासून उकाडा वाढत गेला. त्यातच लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळं सगळेच लोक घरात होते. साहजिकच एप्रिल व मे महिन्यात विजेचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. ३१ मे नंतर लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर वीज कंपन्यांनी पूर्वीप्रमाणे मीटर रिडींग घेणं सुरू केले. त्यानुसार पाठवलेले बिल हे एप्रिल व मे महिन्यातील प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत होते. तो आकडा आधीच्या तुलनेत मोठा होता. त्यामुळे ग्राहकांना आता ‘शॉक’ बसला आहे. वीज बिलाची आकारणी साधारणपणे चार टप्प्यांमध्ये केली जाते. ०-१००, १०१-३००, ३०१ ते ५०० आणि ५०१ युनिटच्या वर असे हे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यानुसार विजेचा दर वाढत जातो. एप्रिल, मे महिन्यातील बिलात ग्राहकांना याचाही फटका बसला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com