मला काँग्रेसकडून ऑफर होती; एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव । विधानपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सहाव्या जागेसाठी काँग्रेसकडून ऑफर होती आणि भाजपच्या ६-७ आमदारांनीही क्रॉस व्होटिंग करण्याची तयारी दर्शवली होती, असा खळबळजनक गौप्यस्फोट भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मात्र आपण ही ऑफर नाकारली, असा दावाही खडसे यांनी केला. भाजपनं विधानपरिषद निवडणुकीचे तिकीट नाकालल्यानं खडसे सध्या पक्ष नैतृत्वावर तीव्र नाराज आहेत. अशातच आपल्याला सत्ताधारी पक्षाकडून निवडणूक लढवण्याची ऑफर होती आणि भाजपमधील काही आमदार आपल्या पाठिशी होते असा खडसे यांनी दावा केल्यानं पुन्हा  एका नव्या राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे अशा ज्येष्ठ नेत्यांची विधानपरिषदेवर वर्णी लागेल अशी चर्चा असताना त्यांना डावलून भाजपकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे खडसे यांनी आपली खदखद प्रसार माध्यमांसमोर जाहीरपणे व्यक्त केली. यावेळी खडसे म्हणाले, ”आम्हाला तिकीट मिळाले नाही याचे दुःख नाही, पण ज्यांनी वर्षानुवर्षे पक्षाविरोधात काम केले अशा पक्षाबाहेरून आलेल्या लोकांना तिकीट देण्यात आले. त्याऐवजी माधव भंडारी, मिलिंद पाटील, नीता केळकर, मकरंद देशपांडे, केशव उपाध्ये यांच्यासारखे लोक वर्षानुवर्षे निष्ठेने काम करत आहेत. कधीतरी विधानपरिषद आपल्याला मिळेल या आशेवर ते आहेत. पण निष्ठावंतांना डावलण्यात आले. हा अन्याय आहे,” असे खडसे यांनी म्हटलं.

”गेल्या वेळी राज्यसभेला तिकीट मिळालं नाही तेव्हा आपली विधानपरिषदेवर वर्णी लावली जाईल, असे मला सांगण्यात आले होते. विधानपरिषदेसाठी शिफारस केली गेली तेव्हाही आम्हा तिघांची नावे होती असे सांगण्यात आले. पण प्रत्यक्षात पक्षाने ज्यांची शिफारस केली नव्हती, अशा गोपीचंद पडळकर, रणजीतसिंह मोहिते-पाटील, प्रवीण दटके आणि डॉ. अजित गोपचडे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. निष्ठावंत आणि वर्षानुवर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली. त्यामुळे राज्यभरातील कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने आता राजकारण करणे योग्य नाही. पण कोरोनाचा विषय संपल्यानंतर योग्य तो निर्णय घेऊ,” असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजप नैतृत्वाला दिला आहे.

”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment