सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावर अखेर सुप्रिया सुळेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाल्या..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह प्रकरणात सीबीआय चौकशी व्हावी, अशी भूमिका घेतल्यामुळे पवार कुटुंबात त्याचे जोरदार पडसाद उमटले होते. या पार्श्वभूमीवर आज पुण्यात खासदार सुप्रिया सुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेत बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत चर्चा केली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सुप्रिया सुळे यांना सुशांतसिंह प्रकरणावर विचारणा केली असता त्यांनी यावर एका वाक्यात उत्तर दिलं. ‘अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाबाबत माझा अभ्यास नाही’ असं सांगत सुप्रिया सुळे यांनी याप्रकरणी बोलणे टाळले.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून पवार कुटुंबात मोठा कलह पाहायला मिळाला. याचं कारण म्हणजे, सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी उघड भूमिका पार्थ पवार यांनी घेतली होती. तसं पत्र त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं. मात्र ही मागणी देशमुख यांनी फेटाळली होती. त्यानंतर शरद पवार यांनी नातू पार्थ यांना या मागणीवरून फटकारले होते. पार्थचा अनुभव तोकडा आहे. त्याच्या म्हणण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही, असे पवार म्हणाले होते.

त्यानंतर बरीच खळबळ माजली होती. दुसरीकडे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ होते. सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी निर्णय दिला आणि सुशांत प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला. या निर्णयावरही पार्थ यांनी ‘सत्यमेव जयते’ असं खोचक ट्विट केल्याने त्यावरूनही चर्चेला तोंड फुटले होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुप्रिया कोणती प्रतिक्रिया देतात, हे फारच महत्त्वाचे होते. मात्र त्यांनी हा विषयच आज टाळला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment