मला देशद्रोही म्हणालात तरी हरकत नाही, पण मोदीजी तुम्ही यावेळी चूकलाय..!! – कमल हासन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चमकोगिरीच्या पलीकडे | जेव्हा देशातले झंडूबामपासून च्यवनप्राशपर्यंत वस्तू विकणारे अभिनेते काळा चष्मा हरवल्याच्या कारणाने मूळ मुद्द्यावरून लोकांचे लक्ष भरकटवण्यात गुंतले आहेत. यावेळी सामाजिक भान जागृत असलेल्या प्रसिद्ध अभिनेते कमल हसन यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी लिहिलेले पत्र सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. हॅलो महाराष्ट्रच्या वाचकांसाठी हेच पत्र मराठीतून देत आहे. कमल हसन यांचं स्पष्ट म्हणणं आहे की, टाळी-थाळी वाजवून आणि दिवे लावून अशा महामाऱ्या संपवता येत नसतात. 

सेवेमध्ये,
माननीय प्रधानमंत्री,
भारतीय गणराज्य.

आदरणीय महोदय, मी हे पत्र आपल्याला देशातील जबाबदार मात्र नाराज नागरिकांच्या वतीने लिहीत आहे. 23 मार्चला मी आपल्याला लिहिलेल्या पहिल्या पत्रात मी सरकारला आग्रह केला होता, की अशा संकटकाळात आपल्या समाजातील अनाम नायक असणाऱ्या असहाय, कमकुवत आणि आश्रित लोकांकडे दुर्लक्ष करू नका. दुसऱ्याच दिवशी राष्ट्राने एका कडक  संचारबंदीची घोषणा तात्काळ ऐकली. जी जवळपास नोटबंदीच्या शैलीतच केली गेली. मी हतबल नक्कीच झालो होतो, पण मी तुमच्यावर, लोकांनी निवडलेल्या नेत्यावर विश्वास ठेवण्याचा पर्याय निवडला. लोक आमच्यापेक्षा अधिक जाणकार आहेत या समजुतीवर मी तुमच्यावर विश्वास ठेवू पाहत होतो. मागच्या वेळी जेव्हा नोटबंदीची घोषणा केली होती, तेव्हासुद्धा मी तुमच्यावर विश्वास ठेवण्याचा पर्याय निवडला होता. पण काळाने हे सिद्ध केले की मी चूक करुन बसलो. दोन्ही वेळा. काळाने हे सिद्ध केले की तुम्ही एकदम चूक होता महोदय. सगळ्यात आधी मी तुम्हांला सांगू इच्छितो, तुम्ही या देशाने निवडलेले नेते आहात. १४० करोड भारतीय या संकटकाळातील कोणत्याही परिस्थितीत तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करतील. आज कदाचित जगात असा दुसरा कोणता नेता नाही, ज्याच्याकडे या प्रकारचे जनसमर्थन आहे. तुम्ही जे बोलता, जनता त्याचे अनुकरण करते. आज सगळ्या देशात या प्रयत्नांसाठी एकजूट आहे आणि त्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे. तुम्ही बघितलं असेल, जेव्हा तुम्ही आरोग्यासाठी निस्वार्थ भावनेने परिश्रम करणाऱ्या अगणित आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यासाठी देशवासियांना आव्हान केले, तेव्हा सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या-थाळ्या वाजविल्या, त्यांचा जयजयकार केला. आम्ही तुमच्या ईच्छा आणि आदेशांचे पालन पुढे सुद्धा करू. पण आमच्या या समर्थनाला आमची अगतिकता आणि अधीनता समजू नका. माझ्या लोकांच्या नेत्याच्या रूपात माझी स्वतःची भूमिका आणि मनातली गोष्ट सांगण्यासोबतच तुमच्या पद्धतींवर प्रश्न उठवण्यासाठी हे प्रसंग मला लाचार करत आहेत. जर माझ्या शब्दांमध्ये शिष्टाचाराची कमतरता जाणवत असेल, तर कृपया क्षमा करा.

नोटबंदीची ती चूक पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात केली जात आहे याची मला सगळ्यात जास्त भीती वाटत आहे. नोटबंदीने गरीब लोकांच्या बचतीचे आणि उपजीविकेचे सर्वाधिक नुकसान केले आहे. तुमची ही अनियोजित संचारबंदी आमच्या जीवन आणि उपजिविका या दोन्हीवर घातक परिणाम करणार आहे. गरिबांच्याजवळ त्यांची काळजी करण्यासाठी तुमच्याशिवाय कुणीच नाही आहे महोदय. एकीकडे तुम्ही अधिक विशेषाधिकार प्राप्त लोकांना प्रकाशाचा तमाशा आयोजित करण्यास सांगत आहात, आणि दुसरीकडे गरिबांची दुर्दशा स्वतः एक वेदनादायी तमाशा बनतो आहे. ज्यावेळी तुमच्या जगातील लोकांनी आपल्या बाल्कनीत तेलाचे दिवे लावले आहेत, त्यावेळी गरीब आपली पुढची भाकरी भाजण्यासाठी थोडेसे तेल जमविण्यासाठी संघर्ष करतो आहे. राष्ट्राच्या नावे आपल्या शेवटच्या संबोधनामध्ये तुम्ही त्या लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होता. जे या परिस्थितीत आवश्यकसुद्धा आहे, पण याशिवाय देखील अत्यंत महत्वाचं असं बरंच काम करणं अजून बाकी आहे. मनाच्या शांततेचे हे तंत्र विशेषाधिकार संपन्न लोकांच्या चिंतेचे समाधान करू शकते, ज्याच्याकडे आनंद व्यक्त करायला बाल्कनी आहे. पण त्या लोकांचे काय, ज्यांच्या डोक्यावर छतसुद्धा नाही? माझी खात्री आहे की आपण केवळ बाल्कनीवाल्या लोकांसाठी सरकार चालवू इच्छित नसाल. किंवा त्या गरिबांनाही पूर्णतः दुर्लक्षित करावं असं तुम्हाला वाटत नसेल, जे लोक आपला समाज, आपल्या पायाभूत सुविधा यांची सर्वात मोठी आधार संरचना तयार करतात. ज्यावर मध्यमवर्गीय आणि संपन्नवर्गीय आपलं जीवन निर्माण करतात. गरीब माणूस जरी कधी पहिल्या पानावरची बातमी बनू शकला नाही तरी राष्ट्रनिर्माणासाठी तो घेत असलेले कष्ट, त्याचा एकूण विकासातील वाटा मध्यम आणि उच्चभ्रू म्हणवून घेणाऱ्या लोकांना नजरेआड करता येणार नाहीच.

देशात या कामगार वर्गाची बहुमत भागीदारी आहे. इतिहासाने हे सप्रमाण सिद्ध केलं आहे की, पाया नष्ट करण्याच्या प्रयत्नात शेवटी कळसाला जास्त धोका असतो. इथपर्यंत विज्ञानाने देखील याला सहमती दिली आहे. कोरोना महामारीचं संकट असं आहे की जिचा समाजाच्या वरिष्ठ स्तरापासून तळापर्यंत उद्रेक झाला आहे. त्याचा प्रसार सगळ्यात वरपासून खालच्या दिशेने होत आहे. पण तुम्हाला बघून असं वाटतय की, तुम्ही सगळ्यात खालच्या जनतेला सोडून वरच्यांना दिलासा देण्याचा प्रत्येक संभव प्रयत्न करीत आहात. रोजंदारी कामगार, घरकाम करणारे कामगार, रस्त्यावरचे- रुळावरचे विक्रेते, ऑटो रिक्षा तसेच टॅक्सी चालक आणि असहाय प्रवासी कामगार या आशेवर सगळा त्रास सहन करीत आहेत की या लांब बोगद्याच्या दुसऱ्या बाजूला प्रकाशाचा एखादा किरण नक्कीच असेल. पण आपण आधीपासूनच सुस्थितीत असणाऱ्या मध्यमवर्गीय किल्ल्यांना आणखी अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहोत. महोदय, मला कृपया चुकीचं समजू नका.
आपण मध्यमवर्गीयांना किंवा तथाकथित उच्चवर्गीयांना सवलत देणं बंद करावं असं मी मुळीच म्हणणार नाही. मला असं वाटतं की समाजातील प्रत्येक स्तरासाठी हे प्रयत्न शासनाने केले पाहिजेत. यानुसार हे सुनिश्चित केले पाहिजे की कुणी उपाशी झोपणार नाही.

COVID-19 ला आणखी बळींचा शोध असणारच..!! पण आपण त्यासाठी गरिबांची भूक (एच), थकवा (ई), अभाव (डी) यांच्यापासून एका वेगळ्याच आजाराचं सुपीक मैदान बनवत आहोत. HED – 20 हा असा आजार आहे, जो दिसायला छोटा वाटतो, पण COVID-19 च्या तुलनेत तो खूप जास्त घातक आहे. 
COVID-19 गेल्यानंतरही याचा प्रभाव बऱ्याच काळापर्यंत जाणवेल. ज्या ज्या वेळी आपल्याला सावरण्याची संधी आहे असं वाटतं त्या त्यावेळी तुम्ही राजकीय स्वार्थ पाहून गोष्टी सावरण्यापलीकडे घेऊन जाता. तुम्ही स्वतः कोणतीही जबाबदारी घेत नाहीच. उलट सुविधांचा जबाबदारीपूर्वक व्यवहार सामान्यांवर टाकून राज्य सरकारकडून पारदर्शकतेची अपेक्षा करत आहात. स्वप्रतिमा निर्माण करण्यात रस असलेले तुम्ही, आता लोकांच्या मनातील चेष्टेचा विषय बनला आहात. खासकरुन भारताचे वर्तमान आणि भविष्य दोन्ही उत्तम बनविण्यासाठी आपल्या बुद्धीचा सर्वोत्तम वापर करुन काम करत आहेत, त्यांच्या नजरेत तरी. जर इथे बुद्धिजीवी या शब्दाने आपल्याला नाराज केले असेल तर मला त्याचा खेद आहे. मला माहीत आहे की, आपणांस बुद्धिजीवी हा शब्द अजिबात पसंद नाही. पण मी पेरियार आणि गांधी यांचा अनुयायी आहे आणि मला माहीत आहे की ते कार्यशील आणि बुद्धिजीवी होते. ही  ती बुद्धी आहे जी सर्वांसाठी धार्मिकता, समानता आणि समृद्धीचा मार्ग निवडण्यासाठी मार्गदर्शन करते. 

केवळ उत्तेजक आणि बनावट प्रचार माध्यमातून येन केन प्रकारे लोकांचा उत्साह जीवित ठेवण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे कदाचित महत्त्वाच्या उपाययोजना दुर्लक्षित करण्याची तुमची ईच्छा दृढ झाली आहे. खरं तर तो मार्ग अवलंबला असता तर खूपसे जीव वाचवता येऊ शकले असते. महामारीच्या या काळात, जेव्हा संपूर्ण देशात कायदा आणि सुव्यवस्था यांना मजबूत ठेवणं खूप गरजेचं होतं. तिथे तुमची लोकं आणि त्यांच्या उपाययोजना देशातील विविध भागातील अज्ञानी, मूर्ख लोकांच्या सभा आणि जमावांना रोखण्यात अयशस्वी ठरली. आज ते भारतात महामारीच्या प्रसारात सर्वात मोठे केंद्र बनले आहेत. या निष्काळजीपणामुळे जेवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागणार आहे त्या सगळ्या लोकांसाठी कोण जबाबदार असेल? जागतिक आरोग्य संघटनेला दिलेल्या सरकारी अधिकाऱ्याच्या 
विधानानुसार, जगामध्ये ८ डिसेंबरला कोरोनाच्या संक्रमणाची पहिली केस नोंदविली गेली होती. भलेही आपण हे तथ्य स्वीकारले असेल की जगाला या स्थितीचे गांभीर्य समजण्यास वेळ लागला पण तरीही फेब्रुवारीच्या सुरवातीपर्यंत सगळ्या जगाला माहीत झाले होते की हा विषाणू एक अभूतपूर्व विध्वंस घडवणार आहे. भारतात पहिली केस ३० जानेवारी ला नोंदविली गेली होती. आपण बघितले होते इटलीमध्ये काय झाले होते. तरीसुद्धा, आपण वेळेत धडा घेतला नाही. शेवटी जेव्हा आपण आपल्या झोपेतून जागे झालो, तेव्हा ४ तासाच्या आत १४० करोड लोकांच्या संपूर्ण देशाला संचारबंदीचा आदेश सुनावला. आपल्याकडे आजाराची माहिती मिळून त्यावर अंमल करण्यासाठी पूर्ण ४ महिन्यांचा वेळ होता. या चार महिन्यांत हातावर हात ठेवून गप्प राहिलात आणि शेवटच्या चार तासांत देशाला बंदी बनवलंत. ही तुमची दूरदृष्टी? दूरदर्शी नेते तर ते असतात जे समस्या गंभीर होण्याआधी त्याचे निराकरण शोधण्याचं काम करतात. 

मला हे सांगताना खेद वाटतो महोदय, यावेळी तुमची दृष्टी अपयशी ठरली आहे. याशिवाय आपले सरकार आणि त्यांचे सहकारी यांची सगळी शक्ती कुठलीतरी प्रतिक्रिया देण्यात आणि विरोधकांच्या टीकेला उत्तरं देण्यातच खर्च होत आहे. राष्ट्रहित लक्षात घेऊन देशाची उन्नती हवे असणारे आवाज कुठूनही आले की त्यांना तात्काळ चिरडून टाकण्यासाठी आणि त्यांची बदनामी करण्यासाठी आपली ट्रोल आर्मी तुटून पडते आणि अशा आवाजांना राष्ट्र-विरोधी करारही दिला जातो. आज मी ही हिंमत केली आहे. ज्याला कुणाला मला राष्ट्र-विरोधी म्हणायचे आहे त्याला खुशाल म्हणू दे. परिणामतः या प्रकारच्या मोठ्या संकटासाठी जर सामान्य लोकसंख्या तयार नाही तर यासाठी त्यांना दोषी ठरवता येऊ शकत नाही. यासाठी केवळ आणि केवळ आपल्याला दोषी ठरवले जाऊ शकते. लोक स्वतःसाठी सरकार निवडतात आणि त्याची मिळेल ती किंमत चुकवतात कारण सरकारने त्यांचे जीवन सुरक्षित आणि सामान्य बनवून ठेवावे एवढीच त्यांची अपेक्षा असते. या महामारीच्या परिणामाकारक घटनांना दोन कारणांनी इतिहासात नोंदवले जाईल. पहिले कारण म्हणजे त्यांच्या मूळ स्वभावामुळे होणारा विनाश (आजार आणि मृत्यू) आणि दुसरे कारण याचा मनुष्याच्या जीवनावर, प्राधान्यक्रमांवर होणारा सामाजिक आणि सांस्कृतिक बदल. निसर्गाने आपल्याकडे फेकलेल्या कोणत्याही विषाणूच्या उद्रेकापेक्षा अधिक खतरनाक आणि चिरस्थायी असणाऱ्या अनास्थेच्या उद्रेकाने माझ्या समाजाला त्रस्त होताना पाहून मी खूप दुखी आहे. 

महोदय, ही वेळ त्या आवाजांना ऐकण्याची आहे जे वास्तवतः एकमेकांशी चर्चेतून मार्ग काढतात. मला त्या लोकांची पर्वा आहे. ही सर्व सीमांना तोडण्याची आणि प्रत्येकाला स्पष्टपणे आव्हान करण्याची वेळ आहे की आपल्या सोबत या आणि मदतीसाठी हात पुढे करा. भारताची सर्वात मोठी क्षमता त्याचे लोक आहेत. आपण इतिहासात मोठमोठ्या संकटाना पार केले आहे. आपण यालाही पार करू. हे करत असताना सगळे एकत्र येवोत आणि इथे पक्षपाताला काहीही जागा रहायला नको. आम्ही नाराज नक्कीच आहोत, पण आम्हीसुद्धा तुमच्यासोबत आहोत. 

जय हिन्द.
कमल हासन
अध्यक्ष, मक्कल नीधि माईयम.

साभार- द हिन्दू, हिंदी अनुवाद- राजेश चन्द्र, मराठी अनुवाद – जयश्री देसाई.

Leave a Comment