उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात बैठक; राज्यातील परिस्थितीचा घेतला आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक पार पडली. शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत दोन्ही नेत्यांनी राज्यातील परिस्थितीसंदर्भात चर्चा केली. याशिवाय या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव अजोय मेहता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

साधारणतः २ तासांपर्यंत ही बैठक सुरु होती. सर्व अधिकाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अहवाल दिला. तसेच या बैठकीत आर्थिक बाबींवर चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं आहे. चौथ्या लॉकडाऊनकडे जाताना राज्याच्या तिजोरीवर जास्त भार पडणार नाही, यासाठी काय उपाययोजन केल्या जाऊ शकतात, यावर या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मागील सुमारे ५५ दिवसांपासून सुरु असलेल्या लॉकडाउनचा या बैठकीत संपूर्ण आढावा घेण्यात आला. राज्यातील आरोग्य स्थिती, वैद्यकीय यंत्रणा कोरोनाशी कशा पद्धतीने मुकाबला करत आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, परराज्यातील मजुरांची त्यांच्या राज्यात ने आण करण्याची व्यवस्था, त्यातील येणाऱ्या अडचणी याविषयी सविस्तर चर्चा झाली.

राज्यात २० एप्रिलनंतर ग्रीन व ऑरेंज झोनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणून उद्योग- व्यवसाय सुरु करण्यात आले होते. ६५ हजार उद्योगांना काम सुरु करण्यास मान्यता देण्यात आली असून ३५ हजार उद्योग सुरु झाले आहेत. तसेच, ९ लाख कामगार रुजू झाल्याचेही सांगण्यात आले. परराज्यातील मजुरांना पाठविण्याचे काम सुरु असून, पश्चिम बंगालचा अपवाद वगळता इतर राज्यांमध्ये रेल्वे पाठविणे सुरु आहे. उद्योग सुरु झाल्याने औद्योगिक घटकाकडून विजेचा वापर ५० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तसेच, परप्रांतीय कामगार परत गेल्याने उद्योगांना कामगार पुरविण्यासाठी कामगार ब्युरो कार्यरत करण्यात आला असल्याची माहितीही देण्यात आली.

या बैठकीत आरोग्य व्यवस्थेचा आढावा, वैद्यकीय उपकरणांची गरज तसेच रिक्त पदे भरणे यावरही चर्चा झाली. तसेच, लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील कोणत्या भागात शिथिलता आणायची, रेड झोन्स, कंटेनमेंट झोन्समध्ये बंधने कशा पद्धतीने पाळायची यावरही चर्चा झाली. दरम्यान, देशभरातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे राज्यातील अनेक उद्योगधंद्यांना खिळ बसली आहे. याबाबत सतत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणारे शरद पवार यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारला पत्र पाठवलं आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशात अडचणीत सापडलेल्या साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने मदत करावी अशी मागणी करणारं पत्र शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment