राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

लखनऊ । काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेश राज्यातील आझमगडमधील बांसा या गावात दलित सरपंचाची हत्या झाली होती. दरम्यान, वाराणसीच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत आज बांसा येथे जाऊन मृतक सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेणार होते. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होईल, असे सांगत उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना प्रवेश नाकारत ताब्यात घेतले.

गुरुवारी (२० ऑगस्ट) उत्तर प्रदेशात दौऱ्यावर आलेले नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी आझमगडच्या सीमेवर थांबवत त्यांची गाडी अडवली. यावेळी आपल्याला आझमगडमध्ये प्रवेश करुन द्यावा, असे नितीन राऊत यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिसांनी यासाठी परवानगी नसल्याचे सांगत नितीन राऊत यांना ताब्यात घेतले. यानंतर नितीन राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह घटनास्थळी ठिय्या मांडला आहे. बांसा गावात जाऊन सरपंचाच्या कुटुंबीयांची भेट घेऊन देत नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही, असे नितीन राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या या कृतीवर काँग्रेसचे माजी खासदार राजीव सातव यांनी टीका केली. त्यांनी म्हटले की, प्रियंका गांधी उत्तर प्रदेशच्या प्रभारी झाल्यापासून त्यांनी स्थानिक प्रश्न उचलून धरले आहेत. यापूर्वी प्रियंका गांधी यांनाही अशाप्रकारे अडवण्याचा प्रयत्न झाला होता. काँग्रेसच्या नेत्यांनाही अटक करण्याचे प्रयत्न अनेकदा झाले आहेत. उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. दिवसाढवळ्या खून आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. काँग्रेसकडून याविरोधात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठीच नितीन राऊत आझमगढ येथे गेले होते. मात्र, एका मंत्र्याला अशाप्रकारे पोलिसांनी अटक करणे ही निषेधार्ह कृती असल्याचे राजीव सातव यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment