‘मंथन’ – सामाजिक प्रगल्भतेची शक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चित्रपटनगरी | घनश्याम येणगे

गुजरात मधील दूध उत्पादक सहकारी संघाच्या उभारणीची हि कथा. श्याम बेनेगल या प्रतिभावंत दिग्दर्शकाने समर्थपणे उभी केली आहे. गुजरातमधल्या ५ लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपये देऊन क्राऊड फंडिंगमधून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारताच्या दुग्ध क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन हा सिनेमा बनवला आहे. वर्गीस कुरियन यांनी स्वतः विजय तेंडुलकर यांच्यासोबत या कथेचे लेखन केले आहे. गिरीश कार्नाड, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा, अमरीश पुरी, मोहन आगाशे, अनंत नाग अशा दिग्गज अभिनेत्यांनी यात काम केले आहे.
यात अत्यंत आदर्शवादी अशा पशुवैद्यकीय डॉक्टर राव या तरुणाची भूमिका गिरीश कर्नाड यांनी केली आहे. हा तरुण गावात सहकारी दूध संस्था उभारण्यासाठी येतो. आणि त्याचा गावातील अनेक प्रस्थापित गोष्टींशी संबंध येऊन संघर्ष होतो. कुणाकुणाशी संघर्ष होतो त्याचा तर, खाजगी डेअरीचा मालक असणाऱ्या सावकाराशी (अमरीश पुरी), दूध संघ आपल्याच ताब्यात असावा असे मानणाऱ्या सरपंचाशी (कुलभूषण खरबंदा), आणि गावातल्या जातिव्यवस्थेशी. या सर्व संघर्षांना पुरून उरून डॉक्टर राव लोकांच्या मनात ‘दूध संघ आपल्या मालकीचा आहे आणि त्यात आपला फायदा आहे’ हे बिंबवतात त्याची हि कहाणी.
यातले काही प्रसंग अगदी लक्षात राहतात. २० वर्षांपासून गावाच्या सरपंचपदावर असलेली व्यक्ती म्हणजे खरबंदा दूध संघाची निवडणूक हरतो व तेही दलित उमेदवाराकडून तेंव्हा त्याला झालेला जळफळाट आणि अस्वस्थता कुलभूषण खरबंदाने इतकी जबरदस्त उभी केली आहे कि त्याला तोड नाही. स्वाभिमानी आणि तडफदार अश्या ‘भोला’ या दलित तरुणाची भूमिका नसिरुद्दीन शहा ने केली आहे. ती हि अप्रतिम. वर्षानुवर्षे अन्याय सहन केलेल्या लोकांना आता सहकारी दूध संघामुळे मालकीचा आणि मतदानाचा सामान अधिकार मिळाला आहे. अशी जाणीव तो सतत लोकांना करून देत असतो. ”ई सिसोटी अपनी है अपनी है….. अपनी …..!” असं तो जीव तोडून सगळ्यांना सांगत असतो. चित्रपटात खाजगी डेअरीचा मालक मिश्राजीची भूमिका अमरीश पुरी यांनी केली आहे. अत्यंत गोड बोलणारा पण धूर्त, चालाख आणि दूध संघ फोडण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणारा व्यापारी त्यांनी उभा केला आहे. चित्रपटात शेवटी राजकीय दबावामुळे डॉक्टर राव यांची बदली होते. ते निघून जात असताना रेल्वेच्या मागे पळणारा नसिर आपल्याला चित्रपटाचा शेवट निराशावादी आहे असा वाटायला भाग पाडतो पण तो तसा नाही. तो कसा आहे हे पाहण्यासाठी चित्रपटच पहा.

दिग्दर्शक – श्याम बेनेगल
संगीत – वनराज भाटिया
कथा – वर्गीस कुरियन, विजय तेंडुलकर
पटकथा – विजय तेंडुलकर
संवाद – कैफी आझमी
छायालेखक – गोविंद निहलानी

Leave a Comment