अजित पवारांनी काढली गोपीचंद पडळकरांची लायकी; म्हणाले..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका होती. शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना असल्याचे आक्षेपार्ह्य वक्तव्य पडळकर यांनी केलं होतं. त्यावर आज उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गोपीचंद पडळकर यांचा खरमरीत शब्दांत समाचार घेतला.लायकी नसलेल्या लोकांनी पवारांविषयी बोलणे योग्य नाही. आपली पात्रता पाहून त्याप्रमाणे प्रत्येकाने व्यक्त व्हावं, असे सुनावताना केवळ आपल्या समाजात प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा त्यांचा खटाटोप आहे, अशी तोफ अजित पवार यांनी पडळकरांवर डागली.

साताऱ्यात आज अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी पत्रकारांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया जाणून घेतली असता अजित पवार यांनी पडळकर यांना चांगलाच झापलं. ‘आपली योग्यता काय, आपण बोलतो काय? आपण कुणाबद्दल बोलतोय, याचं तरी भान ठेवा, असे सुनावतानाच सूर्याकडे पाहून थुंकल्यावर थुंकी आपल्याच तोंडावर उडते हे लक्षात ठेवा, असा इशाराच अजित पवार यांनी पडळकरांना दिला.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले कि, ‘बारामतीत पडळकरांचं डिपॉझिट जप्त झालं होतं. तिथे जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. एखाद्याला नको तेवढं मोठं केल्याचे हा सारे परिणाम आहेत,’ असा टोलाही अजित पवार यांनी भाजपचा उल्लेख न करता लगावला. काही लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी मठ्या लोकांवर टीका करत असतात. पडळकरांनीही तेच केले आहे. आता त्यांच्या वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. कायदा आपला काम करेल, असे नमूद करत अजित पवार यांनी कठोर कारवाईचे संकेत दिले.

आमदार गोपीचंद पडळकर यांचा समाचार घेताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या कार्याचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. शरद पवार यांना संपूर्ण देश ओळखतो. कोणतंही संकट असलं तरी ते स्वस्थ बसत नाहीत. सतत कार्यरत असतात. या वयातही ते सर्वसामान्यांच्या भेटीगाठी घेतात. त्यांच्या समस्या जाणून घेतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच शरद पवार यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे. शरद पवार यांचा शब्द तेही नेहमी मानतात, असे अजित पवार म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment