कंगनाशी माझं व्यक्तिगत वैर नाही, पण…- संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कंगना राणावत वादावर शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भूमिका मांडली आहे. कंगनाशी व्यक्तिगत वैर नाही, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलीय. पण महाराष्ट्रावर टिप्पणी करणाऱ्यांविरोधात बोलणारच. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राबद्दल कुणी घाणेरड्या शब्दांत टिप्पणी करत असेल तर तो केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा किंवा शिवसेनेचा विषय राहत नाही. तो महाराष्ट्रातील ११ कोटी जनतेचा विषय आहे. त्याबद्दल सर्वांनीच बोलायला हवं,’ असं परखड मत संजय राऊत यांनी आज व्यक्त केलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

जे जे महाराष्ट्राचं खातात, पितात. इथं राहतात त्यांचा आहे. मुंबईला कुणी पाकिस्तान म्हणणं हे अत्यंत गंभीर आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीही याबद्दल आपली भूमिका मांडलीय, मी अभिनंदन करतो,’ असंही राऊत म्हणाले. ‘कंगना राणावतशी माझं व्यक्तिगत वैर नाही. मी माझ्या पक्षाची भूमिका मांडलीय. गृहमंत्री व परिवहन मंत्र्यांनी याबाबत सरकारची भूमिका मांडलीय. त्यामुळं हा वाद आता संपायला हवा,’ अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शिवसेना अत्यंत आक्रमकपणे रस्त्यावर उतरली आहे. याबद्दल विरोधकांनी शिवसेनेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीवरून लक्ष विचलित करण्यासाठी शिवसेना कंगनाला महत्त्व देतेय, असं विरोधकांनी म्हटलं आहे. या सगळ्या आरोपांना राऊत यांनी उत्तरं दिली. ‘कंगनाच्या वक्तव्याचा निषेध सर्वच राजकीय पक्षांनी केला आहे. फक्त शिवसेनेनं केलेला नाही. भाजपचे आशिष शेलार यांनीही तिला समज दिली आहे. पण शेलार यांनी हीच गोष्ट जोरात बोलायला हवी. कारण, महाराष्ट्र त्यांचाही आहे. तेही महाराष्ट्रात राजकारण करतात. हा शिवरायांचा, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राचा अपमान करणारा कोणीही, कितीही मोठा असला तरी आम्ही शांत बसणार नाही,’ असंही राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment