‘नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नाही, तो इमॅच्युअर आहे’; शरद पवारांनी टोचले पार्थ पवारांचे कान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची पार्थ पवार यांची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावली आहे. मी माझ्या नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही, असं सांगत शरद पवार यांनी पार्थ यांना फटकारले आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एका बैठकी निमित्त आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना पवारांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

शरद पवार म्हणाले कि, ‘पार्थचा अनुभव कमी आहे. तो प्रगल्भ नाही. त्यामुळे माझ्या नातवाच्या बोलण्याला मी कवडीचीही किंमत देत नाही. तसेच कुणाला सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करायची असेल तर आमचं काही म्हणणं नाही. कुणाला सीबीआय चौकशीची गरज वाटत असेल तर त्याला विरोध असण्याचं कारणही नाही. मात्र, महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

‘मुंबई पोलिसांना मी गेली ५० वर्षे ओळखतो, त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे कुणी काय आरोप केले, यात मी खोलात जाणार नाही. माझ्यासाठी हा विषय तितका महत्त्वाचा नाही. एखाद्याने आत्महत्या केली, तर नक्कीच दु:ख होत. पण त्याची चर्चा ज्या पद्धतीने होत आहे. त्याचे मला आश्चर्य वाटते. सातारा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने मला याबद्दल विचारलं. त्यालाही याबद्दल आश्चर्य वाटलं. २० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, तरी त्याची नोंद घेतली जात नाही,’ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

दरम्यान, शरद पवार यांच्या वक्तव्यावर बोलण्यास पार्थ पवार यांनी नकार दिला. मला काहीही प्रतिक्रिया द्यायची नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी पार्थ पवार यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी एक निवेदन देऊन सुशांत प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment