गोपीचंद पडळकरांमुळे धनगर समाजाची फसवणूक झाली : प्रतिक पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,

वसंतदादा कुटुंबियांनी धनगर समाजाचे पूर्वीपासून नेतृत्व केले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत समाज गोपीचंद पडळकर यांच्यामुळे भाजपकडे गेला होता. मात्र समाजाला आरक्षण मिळाले नाही. आता या निवडणुकीत पडळकरांना समाज भुलणार नाही. समाज ‘स्वाभिमानी’च्या पाठीशी राहील, असा विश्वास माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांनी व्यक्त केला.

वसंतदादा पाटील यांनी वंचित समाजाचे नेतृत्व केले होते. धनगर समाज त्यांच्या पाठीशी होता. दादानंतर प्रकाशबापू पाटील यांनी देखील समाजाचे नेतृत्व केले. समाजाने मला देखील साथ दिली. मात्र आरक्षणाच्या विषयावरून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत धनगर समाजाने गोपीचंद पडळकर यांचे नेतृत्व स्वीकारले. समाजाने भाजपला साथ दिली. मात्र पाच वर्षात समाजाला आरक्षण दिले नाही असे प्रतिक पाटील म्हणाले आहेत.

पडळकर आता वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. मात्र त्यांना धनगर समाज साथ देणार नाही. २०१४ च्या निवडणुकीत एकवेळा समाज फसला आहे. शिवाय पडळकर आता पंतप्रधान, मुख्यमंत्री व भाजपवर टीका करत नाहीत. उलट खासदारांवर टीका करतात. त्यांची नेमकी भाजप विरोधात काय भूमीका आहे? भाजपशी तुमचे नाते आहे की तुटले आहे, हे जाहीर करावे समाजाला सर्वकाही कळते. त्यामुळे आता समाज भुलणार नाही. स्वाभिमानीच्या पाठीशी धनगर समाज उभा राहील असा विश्वास प्रतिक पाटील यांनी बोलताना व्यक्त केला.

Leave a Comment