.. तेव्हा का काळ्या चड्ड्या घालून आंदोलन केलं नाही? संजय राऊतांचा भाजपला बोचरा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना व्हायरसशी लढण्यात राज्य सरकारला अपयश येत असल्याचा आरोप करत भाजप ‘महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करत आहे. भाजपचे नेते काळे झेंडे घेऊन राज्य सरकारविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आता भाजपच्या या आंदोलनावर शिवसेनेने बोचरी टीका केली आहे. विरोधी पक्ष म्हणून भाजप अपयशी ठरल्यामुळे ते हे आंदोलन करत आहेत. भाजपचे हे आंदोलन पूर्णत: फसलेलं आहे. हे फक्त भाजप नेत्यांचं आंदोलन होतं. जनता यात सामील झाली नाही, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मला तर आज आकाशात काळे कावळेसुद्धा दिसले नाहीत.

संजय राऊत यांनी भाजपच्या आंदोलनाच्या भूमिकेचा चांगलाच समाचार घेतला. संजय राऊत यांनी भाजपला आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला हलवण्याच्या मुद्द्यावरून घेरलं. संजय राऊत म्हणाले, ‘आंदोलनचं करायचं होतं तर मग भाजपने मुंबईतून आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मोदी सरकारनं गुजरातला हलवल्यानंतर काळ्या चड्ड्या घालून आंदोलन करायला पाहिजे होते,’ असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

दरम्यान, भाजपचं आंदोलन म्हणजे डोमकावळ्याची फडफड, अशी टीका सामनामधून करण्यात आली होती. सामनाच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं. ‘दुसऱ्याच्या घरात रोज डोकावणाऱ्या पत्रपंडितांनी भाजपच्या आंदोलनावर भाष्य केले नसते तर आम्हालाच चुकल्यासारखे वाटले असते. आम्ही डोमकावळे तर तुम्ही कोण? लबाड लांडगे? सत्तेची फळं खायची,त्याच झाडाची मुळं खणायची! त्यांची अशीच गत व्हायची! आता बोलून नाही, महाराष्ट्रात करुन दाखवा!’, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं होतं. आशिष शेलार यांच्या वक्तव्यालाही सडेतोड उत्तर संजय राऊत यांनी दिलं. भाजपचं आंदोलन अपयशी ठरल्यामुळे त्यांचा जळफळाट झाल्याने ते टीका करत असल्याचं संजय राऊत म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment