मुंबईतले उद्योग पळवून घेऊन जाणे कोणाच्या बापाला शक्य नाही ; शिवसेनेचा योगींवर हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन ते उत्तर प्रदेशमध्ये मुंबईसारखी फिल्मसिटी बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. मुंबईतली मायानगरी यूपीला हलवण्याचा योगी आदित्यनाथांचा प्रयत्न असल्याचा दावा करत शिवसेनेने योगींना लक्ष्य केले आहे. कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. असा हल्लाबोल शिवसेनेने आपल्या सामना मुखपत्रातील अग्रलेखात केला आहे.

काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात –

योगींना लवकरात लवकर मायानगरीचा मुहूर्त करायचा आहे व त्यासाठी त्यांनी घाई सुरू केली आहे. प्रख्यात खिलाडी अक्षय कुमार योगींना भेटल्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. अक्षय कुमार यांची महती काय वर्णावी! ते महान कलाकार आहेतच, पण आंबे चोखून खाण्याबाबतच्या कलेत ते पारंगत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्याशी त्यांनी आंबे चोखून खाण्याबाबत केलेली चर्चा गाजली. आता योगी महाराजांकडे त्यांनी बहुधा ‘चोखलेल्या आंब्याची प्रेमकथा’ अशा कहाणीचे स्क्रिप्ट सादर केलेले दिसते. असो. हा झाला गमतीचा भाग. आणखीही कोणी कलावंत आणि इतर मंडळी त्यांना भेटली असतील. चांगली गोष्ट आहे.

योगी महाराजांना उत्तर प्रदेशात उद्योगधंदा वाढवायचा आहे. त्यासाठी ते मुंबईत आले. लॉकडाऊन काळात हीच मंडळी मुंबईवर दुगाण्या झाडीत होती. आता त्याच मुंबईत ते आले आहेत. मुंबईचे वैभवच तसे आहे. आज संपूर्ण देशच तसा भिकेला लागला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत वाराणसीच्या गंगातटी दीपोत्सव साजरा झाला असला तरी लोकांच्या जीवनातले दिवे विझलेलेच आहेत.

उत्तर प्रदेश हे मोठे राज्य असूनही ते फक्त लोकसंख्येनेच फुगले आहे. जातीयता, धर्मांधता यातून निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देशाला भेडसावीत आहे. उद्योग नाही म्हणून बेरोजगारी आहे. त्या सर्व श्रमिकांचे, बेरोजगारांचे लोंढे मुंबईसारख्या शहरांवर आदळत आहेत. लखनौ, कानपूर, मेरठ अशा शहरांतील कलाकार, संगीतकार, लेखक वगैरे मंडळी करीअर करण्यासाठी वर्षानुवर्षे मुंबईतच येत आहेत. योगी या सगळ्यांनाच आपल्यासोबत घेऊन जाणार का? योगी जिद्दीला उतरले आहेत व त्यांनी फिल्म सिटीचे मनावर घेतले आहे. योगी महोदयांनी आता खुलासा केला आहे की, आम्ही काही कोणाची पर्स उचलून नेत नाही. आम्ही उत्तर प्रदेशात नवी फिल्म सिटी बनवीत आहोत. कोण उत्तम सुरक्षा आणि सुविधा देईल अशी ही स्पर्धा आहे.

फिल्मसिटीच कशाला, मुंबईसारखे रोजगारनिर्मितीचे केंद्र आणि देशाच्या तिजोरीत सर्वाधिक भर घालणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहरही योगींनी उभारायला काहीच हरकत नाही. उत्तर प्रदेशात रोजगार नाही व राज्य आर्थिक आघाडीवर डबघाईस आले आहे. मग उत्तर प्रदेशात रोजगाराचे, उद्योगधंद्याचे मुख्य साधन काय, हा प्रश्न पडला असेल तर त्यांनी ‘मिर्झापूर’ या वेब सीरिजचा आस्वाद घेतला पाहिजे.मिर्झापूरमधील प्रत्येक प्रसंग हेच उत्तर प्रदेशचे वास्तव असावे असे लोकांना वाटते.

प्रश्न इतकाच आहे, कोणी म्हणत असेल की, मुंबईतले उद्योग पळवून नेऊ, तर ते कोणाच्या बापाला शक्य नाही. मुंबईतून उद्योग, फिल्म सिटी पळवून नेणे म्हणजे एखाद्या पोराच्या हातचे चॉकलेट पळवून नेण्याएवढे सोपे नाही. भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील पुढाऱ्यांचे यावर काय मत आहे? की मुंबईला ‘पीओके’ म्हणणाऱ्या नटीस पाठिंबा दिला तसा या मुंबईत आलेल्या योगींनाही त्यांचा पाठिंबा आहे? असा थेट सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment