महामारीचे बाप बनून लोकांच्या जिवाशी का खेळता? ; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जर जगावर कोणतं मोठं संकट आले असेल तर ते कोरोनाचेच संकट आहे असं पंतप्रधान मोदी म्हणाले तरीही राज्यातील भाजप नेत्यांवर याचा काहीही परिणाम होत नाही. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता,असा थेट सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. राज्यातील भाजप नेते त्यांच्या अतिरेकी वागण्यामुळे कोरोनाचा प्रसार करत आहेत असा आरोपही शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात-

शिवसेनेने म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदी यांनी ‘जी – 20’ संमेलनात कळवळून सांगितले, दुसऱ्या विश्वयुद्धानंतर कोरोना हेच सगळ्यात मोठे संकट आहे. मानवतेच्या इतिहासातील हे महत्त्वाचे वळण आहे. एकत्र येऊन त्या संकटाशी सामना करावा लागेल, पण हे झाले जगासाठी. आपल्या देशाचे काय? तेथे दिव्याखाली अंधार आहे व कोरोना हे विश्वयुद्ध वगैरे नसून ‘शुद्ध’ भगवा फडकविण्यासाठी पुकारलेले राजकीय युद्ध आहे, असे मोदी यांच्या भक्तांनी ठरवून टाकले आहे. लोकांच्या जिवाशी का खेळता, महामारीचे ‘बाप’ बनून लोकांना धोक्यात का ढकलता, एवढाच आमचा सवाल आहे. कोरोना हे दुसरे विश्वयुद्ध आहे. याचा अर्थ समजून घ्या. हे विश्वयुद्ध ज्यांनी लादले व नरसंहार घडविला ते हिटलर, मुसोलिनी वगैरे नेत्यांचे पुढे जनतेने काय हाल केले ते महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांनी समजून घ्यावे.

मुंबईवर शुद्ध भगवा फडकवण्याच्या नादात ‘भाजप’ कोरोनाचा प्रसार वाढवत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वगैरे एकवेळ सोडून द्या, पण पंतप्रधान मोदी यांनीही गर्दीचे प्रसंग टाळा. सोशल डिस्टन्सिंगचे भान राखा, असे आवाहन वारंवार केले आहे. पण पं. बंगाल व महाराष्ट्राच्या बाबतीत पंतप्रधान मोदींचे ऐकायचेच नाही असा विडा उचलून भाजपाई रस्त्यावर उतरत आहेत. या अतिरेकी वागण्यांमुळे आपण ‘कोरोना’चा प्रसार वाढवीत आहोत व लोकांच्या जिवाशी खेळत आहोत.

दिल्लीची परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाताना दिसत आहे. त्यामुळे दिल्ली पुन्हा कडक ‘लॉकडाऊन’च्या दिशेने निघाली आहे. दिल्लीतील लग्नसमारंभांवर बंधने आलीच आहेत, पण दिल्लीची लाट मुंबईपर्यंत पोहोचू नये यासाठी महाराष्ट्र सरकार कठोर निर्णयांकडे वळत आहे. मुंबई-दिल्ली विमानसेवा, मुंबई-दिल्ली रेल्वे सेवा पुन्हा बंद करावी का, यावर राज्य प्रशासन विचार करीत आहे. याचाच अर्थ परिस्थिती गंभीर व हाताबाहेर जाताना दिसत आहे. दिल्लीत रोज साधारण दीडशे मृत्यू होत आहेत व सात-आठ हजार नवे रुग्ण समोर येत आहेत. हा आकडा इस्पितळ, कोविड सेंटरमधला आहे. घराघरांत कोरोना रुग्ण आहेत. घरात तपासणीशिवाय मृत्यू होत आहेत. त्याची तर कोठे नोंदच नाही. म्हणजे दिल्लीची स्थिती भयंकर आहे.

मंदिरांबाबत नियम पाळले नाही तर देवही परिस्थिती नियंत्रणात आणू शकणार नाही. त्यात विरोधी पक्ष ज्या बेजबाबदारपणे वागत आहे त्यामुळे स्मशानात लाकडांचा साठा जास्तच करावा लागेल व भाजपची तीच अघोरी इच्छा दिसत आहे. ऊठसूट बोंबा मारत रस्त्यावर उतरायचे. लोकांची गर्दी गोळा करून त्यांना कोरोनाच्या गुहेत ढकलायचे हे काय माणुसकी असलेल्या पक्षाचे लक्षण आहे? भाजपला मुंबईवरचा भगवा उतरवायचा आहे व ते त्यांचे अंतिम स्वप्न आहे. पण त्यासाठी संपूर्ण मुंबईची कोरोना दफनभूमी करायची. कफनाचे मांजरपाट कापडविजयी पताका म्हणून फडकवायची हे लक्षण माथेफिरू विकृतांचे आहे. राजकारण्यांच्या काळजात मायेचा ओलावा नसेल तर ते हे असे बेजबाबदारपणे वागतात व त्यात निरपराध्यांचे बळी गेले तर त्याचा विजयोत्सव साजरा करतात. दुसऱ्याच्या पराभवात एक वेळ आनंद मानता येईल, पण कोरोना महामारी संकट वाढविण्यास हातभार लावायचा. ते वाढले की त्यावर सरकारला कोंडीत पकडायचे, असा विचार करणे म्हणजे आपल्याच प्रजेला डोळ्यादेखत महामारीच्या कत्तलखान्यात पाठविण्यासारखे आहे. असेही सामना अग्रलेखात म्हंटल आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com