“उध्दवा अजब तुझे सरकार!” दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन राजू शेट्टी आक्रमक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात काल बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाला परवानगी नसल्याने राजू शेट्टी व त्यांच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांविरोधात बारामती शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. यावरून राजू शेट्टी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरुन ठाकरे सरकारला त्यांनी खडे बोल सुनावले आहेत.

“मोर्चामध्ये गाईचा छळ केला म्हणून माझ्यासह कार्यकर्त्यांच्यावर गुन्हा दाखल करता. मग रेवनाथ काळे या राहुरीच्या शेतकऱ्याने दुधाला भाव नसल्याने आत्महत्या केली. या आत्महत्येस जबाबदार असणा-या दुग्धविकास मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा कधी दाखल करता?” असं राजू शेट्टी यांनी ट्विट केलं आहे. याशिवाय मोर्चातील सहभागी शेतकऱ्यांना संबोधित करताना राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. “आता आक्रमक व्हा, मंत्री आले की दुधाने आंघोळ घाला”, असं राजू शेट्टी यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना आवाहन केलं.

“महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून, सातत्याने आंदोलन करत आहे. उत्पादन खर्चापेक्षा १५ रुपये कमी दराने तो दूध विकत आहे. त्यावेळी कुणाला दया आली नाही. अनेक दूध उत्पादकांनी दुधाचा धंदा परवडत नाही, म्हणून आत्महत्या केल्या. त्या आत्महत्यांना जबाबदार म्हणून राज्याच्या दुग्धविकास मंत्र्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा असं पोलिसांना वाटलं नाही. परंतू , परवानगी नसताना मोर्चा काढला म्हणून जर का आमच्यावर गुन्हा दाखल होत असेल, तर होय आम्ही गुन्हा केलेला आहे. पोलिसांना जे काय करायचं ते करावं, सरकारला जे काय करायचं ते करावं. अजूनही आम्ही गप्प बसणार नाही. जोपर्यंत दूध उत्पादकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा कायदा हातात घेऊन आम्ही आंदोलन करणार.” असा व्हिडिओ देखील त्यांनी ट्विटबरोबर जोडलेला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment