लोकसभेच्या निकालावर पैज लावणे पडले महागात ; दोघांना ही झाली अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे ,
सांगली लोकसभा निवडणुकीमध्ये कोण विजयी होणार यावर एक लाख रुपयांची पैज लावणं मिरजेतील दोघांना चांगलंच महागात पडलं. पैज लावणाऱ्या दोघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी विजयनगर येथील राजू कोरे आणि शिपुर येथील रणजित देसाई यांना अटक करण्यात आली आहे.
 सांगली लोकसभा मतदार संघासाठी दि. २३ रोजी मतदान झाले. या निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये चुरशीने लढत झाली. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र मिरज तालुक्यातील संजय पाटील आणि विशाल पाटील यांच्या समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या विजयावर पैज लावली. राजकुमार कोरे याने भाजपचे संजय पाटील निवडून येणार तर रणजित देसाई याने विशाल पाटील विजयी होणार अशी पैज लावली. त्यांनी या पैजेसाठी नोटरीही करून घेतली आहे. तब्बल एक लाख रुपयांची ही पैज लागली आहे. मात्र या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरीता पैज लावून शंभरच्या स्टॅम्पवर सह्या केल्या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत पोलिस हवालदार चंद्रकांत वाघ यांनी फिर्याद दिली आहे.
राजकुमार कोरे व रणजित देसाई यांच्याविरुद्ध जुगार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज त्यांना अटकही करण्यात आली आहे. पैज लावल्यानंतर गुन्हा दाखल झाल्याने मिरज तालुक्यासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Leave a Comment