एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी ‘यांच्या’कडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी शिवसेना का सोडली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

किस्से राजकारणाचे | छगन भुजबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाव. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरु करणाऱ्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गावागावात शिवसेना पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना छगन भुजबळांचं शिवसेनेशी नेमकं काय बिनसलं? बाळासाहेबांना न जुमानता ते दुसऱ्या पक्षात कसे गेले? वाचा ही खास स्टोरी.

१९९० च्या विधानसभा निवडणुकांत शिवसेनेला ५२ जागा मिळाल्या आणि विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडे आलं. ओबीसी (१३ जागा), कुणबी-मराठा (२७ जागा) यांचं या जागांमधील प्रमाण अधिक होतं. या सगळ्या पराक्रमात छगन भुजबळ यांचा मोलाचा वाटा असताना विरोधी पक्षनेतेपद मात्र मनोहर जोशी यांना देण्यात आलं. १९८५ पासून विधानसभेत शिवसेनेला एकहाती सांभाळणाऱ्या भुजबळांसाठी हा धक्का अनपेक्षित होता.

छगन भुजबळांना त्यावेळी मुंबईचं महापौरपद देऊन महापालिकेत धाडण्यात आलं. यानंतर वादाची ठिणगी पडण्याचं दुसरं कारण म्हणजे मंडल आयोगाच्या शिफारशींना छगन भुजबळांनी दिलेला पाठिंबा. ओबीसींना आरक्षण देणाऱ्या मंडल आयोगाला बाळासाहेब ठाकरेंचा विरोध होता. आपले ओबीसी मतदार नाराज झाले तरी चालतील पण मंडल आयोगाला विरोध राहील अशी ठाम भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. छगन भुजबळ यांनी मात्र जनता दलाच्या नेतृत्वातील राष्ट्रीय आघाडीच्या सरकारचं मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी कौतुक केलं आणि पाठिंबाही दिला. यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी भुजबळांना चांगलंच खडसावलं. यानंतर छगन भुजबळ यांनी मनोहर जोशींवर टीका करत “विरोधी पक्षनेते म्हणून मनोहर जोशी अपयशी ठरले असून त्यांना बदलण्याची गरज आहे” असं जाहीर विधान केलं. आपल्याला महापौर बनण्यात जराही स्वारस्य नसल्याचंही त्यांनी जाहीर सांगून टाकलं.

या दोन प्रकरणानंतर बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी आणि छगन भुजबळ यांच्यात मध्यस्थीही घडवून आणली मात्र शांत राहतील ते भुजबळ कसले? त्यांनी १९९१ च्या डिसेंबरमध्ये १८ आमदारांसह आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचं पत्र विधानसभा अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांना दिलं. २० डिसेंबरला बारा बंडखोर आमदारांसह भुजबळांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

पक्षातून बाहेर पडताना एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी मनोहर जोशींकडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी जोशींवरील आपला रोष पुन्हा व्यक्त केला. यानंतर स्थानिक महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना वेगळं लढले आणि याचा फायदा अर्थातच भुजबळांच्या काँग्रेसला झाला.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”

हे पण वाचा-

रतन टाटांच्या इन्स्टाग्राम पोस्टवर लाईक्सचा पाऊस; तरुणपणातील फोटोने घातला चांगलाच धुमाकूळ

ED ने बदलला मनसेचा झेंडा आणि अजेंडा?

२६ जानेवारी रोजी नेहरुंनी सर्वांत पहिल्यांदा केली होती पुर्ण स्वराज्याची घोषणा

 

 

Leave a Comment