Tuesday, January 31, 2023

राज्यात राष्ट्रपती राजवटीवरून भाजपमध्येच मतभेद; राणेंनी डागली मुनगंटीवारांवर तोफ, म्हणाले..

- Advertisement -

मुंबई । राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणे यांनी केलेली मागणी हे त्यांचं वैयक्तिक मत आहे. भाजपची ती अधिकृत मागणी नाही,’ अशी भूमिका भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी मांडली होती. राणेंच्या राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवरून भाजपनं हात झटकल्यानं पक्षातील मतभेद असल्याचं चित्र दिसत आहे. मात्र, मुनगंटीवारांचे म्हणणं भाजपचे खासदार नारायण राणे यांनी चांगलचं मनाला लावून घेतलं असून त्याबद्दल एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राणेंनी आपले सडेतोड मत मांडले.

‘राज्यपालांकडं जाताना मी त्याची पूर्वकल्पना प्रदेशाध्यक्षांना व फडणवीसांना दिली होती. मुनगंटीवारांना विचारलं नाही. कुणीही मला काही सांगितलं नाही. भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते सीनिअर नेते असतील तर मीही माजी मुख्यमंत्री आहे,’ असं असा टोला राणेंनी सुधीर मुनगंटीवारांना हाणला आहे.

- Advertisement -

ते पुढे म्हणाले, ‘राष्ट्रपती राजवटीबद्दल पक्षाचं मत काय आहे ते प्रदेशाध्यक्ष मांडतील. मी माझं मत मांडलं. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज अडीच ते तीन हजारांनी वाढतेय. मुंबईत आतापर्यंत हजारच्या वर मृत्यू झालेत. लोकांचे जीव वाचवण्यात हे सरकार अपयशी ठरतंय हे मी राज्यपालांच्या निदर्शनास आणलं आणि राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. परिस्थिती पाहूनच मी ही मागणी केलीय. मुनगंटीवारांनी मृतांचे आकडे पाहावेत आणि मग बोलावं,’ असा खोचक सल्ला सुद्धा राणे यांनी मुनगंटीवारांना दिला.

संजय राऊत केंद्र सरकारचे सल्लागार आहेत का?
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायची तर आधी गुजरातमध्ये लावावी लागेल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा राणे यांनी समाचार घेतला. ‘संजय राऊत हे बेताल आहेत. त्यांच्या वक्तव्यावर काही बोलण्याची गरज नाही. ते केंद्र सरकारचे सल्लागार आहेत का? कुठल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लावायची हे सांगण्याचं काम राऊतांना दिलंय का? केंद्र सरकार ते ठरवेल. राष्ट्रपती राजवटीला ते एवढे का घाबरतात?,’ असा सवालही त्यांनी यावेळी केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”