मस्तवाल सत्ताधाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवली; प्रभाकर देशमुखांची गोरेंवर टीका

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

दहिवडी नगरपंचायत रणधुमाळीमध्ये अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून सत्ता काबीज केली. निवडणूक निकालानंतर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी भाजप नेते तथा आमदार जयकुमार गोरे याच्यावर घणाघाती टीका केली आहे. “मस्तवाल विरोधकांना जनतेने त्यांची जागा दाखवून दिली आहे. निकालानंतर आम्ही म्हणजेच सरकार असा आव आणणाऱ्या लोकांना चांगलीच चपराक मिळाली आहे, अशी टीका देशमुख यांनी नाव न घेता आ. जयकुमार गोरेंवर केली.

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी विजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर मतदारांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादीच्या झोळीत सत्ता टाकून दहिवडीकरांनी दाखवलेला विश्वास सार्थ करण्यासाठी आम्ही नेहमी कटीबद्द आहोत. कोणताही विकास न करता स्वतःच्या नावाची प्रौढी मिरवणाऱ्या लोकांना जनतेने त्यांची औकात त्यांना दाखवून दिली.

या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीवाचे रान सरकार खऱ्या अर्थाने कोण असते हे त्यांना माहितीच नाही. सरकार ही जनता असते आणि जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टाचे चीज झाले. आता निकाल लागला आहे. दहिवडीच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत,असे देशमुख यावेळी म्हणाले.

दहिवडी नगरपंचायत रणधुमाळीमध्ये राष्ट्रवादीला एकूण आठ जागा, भाजपला पाच, शिवसेनेला एकूण तीन जागा तर एका अपक्ष उमेदवारालाही आपलं नशीब आजमावण्यात यश आले आहे. अपक्षाने राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीच्या एकूण नऊ जागा झाल्या असून नगरपंचायतीवर एकहाती सत्ता आणण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यशस्वी ठरला आहे. तर या ठिकाणी भाजपला मात्र, एकूण ५ जागांवर आपला झेंडा फडकावा लागला.

दहिवडी नगरपंचायत निवडणुकीत विजयी उमेदवारांच्या जोरावर राष्ट्रवादीने आपल वर्चस्व अबाधित ठेवत विरोधकांना धोबीपछाड केले. तर प्रभाग क्र.६ मधून भाजपचे विद्यमान नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी २४९ मतांनी, प्रभाग ७ मधून युवा नेते तेजस पवार यांच्या भावजय उज्वला पवार २९९, प्रभाग ९ मधून अतुल जाधव यांच्या पत्नी नीलम जाधव ३४०, प्रभाग ११ मधून तानाजी अवघडे यांच्या पत्नी राणी अवघडे २४९,प्रभाग १५ मध्ये रुपेश मोरे ४२० मतांनी दणदणीत विजय मिळवला.