Tuesday, June 6, 2023

प्रदीप शर्मांचा प्रचार करणं पोलीस अधिकाऱ्याला पडलं महागात!

पालघर प्रतिनिधी । नालासोपारा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांचा समाजमाध्यमावरून प्रचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या निलंबनाच्या कारवाई विरोधात त्यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.

पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या नालासोपारा विभागात कार्यरत असणारे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांची बदली करण्यात आली होती. मात्र बदलीच्या ठिकाणी हजर न होता विचारे वैद्यकीय रजेवर गेले होते. दरम्यान, विचारे यांनी आपल्या समाजमाध्यमावर भाजपचे विद्यमान खासदार सत्यपाल सिंह यांच्या सोबतचे छायाचित्र टाकून शिवसेनेचे उमेदवार प्रदीप शर्मा यांच्या कार्याची माहिती ही असलेली पोस्ट टाकली होती.

यामुळे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी मतदारांवर दबाव टाकला, असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. विचारे यांच्याविरुद्ध तुळिंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांनी विचारे यांना निलंबित केले. निलंबनाच्या या आदेशाविरोधात विचारे यांनी न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या छायाचित्रावरून ठपका ठेवण्यात आला होता ते छायाचित्र प्रचारातील नसून विमानतळातील आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.