दोन कोटींचा गंडा घालणारा प्रशांत धुमाळ पुण्यात जेरबंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद: कमोडिटी ट्रेड आरक्षण व्यवसायात गुंतवणुकीचे आमिष दाखवून 2019 मध्ये शहरातील 30 पेक्षा अधिक लोकांना दोन कोटी रुपयांचा गंडा घालणारा प्रशांत रमेश धुमाळ (47) हा दोन वर्षानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागला. तो पुण्यातील वाघोली येथे भाच्या कडे असल्याचे कळताच आठ जून रोजी त्याला अटक करण्यात आली. सिल्लोड च्या विश्वकल्याण मल्टीस्टेट को. ऑप सोसायटीत व्यवस्थापक असलेल्या अनिल कुमार जैस्वाल (30, रा. जाधववाडी) यांचे प्रशांत सोबत जानेवारी 2014 मध्ये पडेगावातील आश्रमात ओळख झाली होती. त्यानंतर सिटीए (कमोडिटी ट्रेड आर्ट) या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा तसेच महिन्याला दहा टक्के व्याज देण्याचे आमिष प्रशांत व त्याच्या पत्नीने जैस्वाल यांना दाखवले.

त्याच्यावर विश्वास ठेऊन एक मार्च 2014 रोजी जैस्वाल यांनी सिटीए व्यवसायात साडेतीन लाख रुपयांची गुंतवणूक केली. सुरुवातीचे काही दिवस प्रशांतने त्यांना 35 हजार रुपयांचा परतावा दिला. त्यामुळे जैस्वाल यांनी आणखी सात लाखांची गुंतवणूक केली. त्यानंतर मात्र प्रशांतने आयकर विभागाचा ससेमिरा, बँकेच्या खात्यात पैसे नाही, खात्याचे व्यवहार बंद झाले, अशी कारणे सांगून टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जैस्वाल यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे धाव घेतली. प्रशांतने 7 लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार केली. त्यावरून प्रशांत ची पत्नी भावना, भाऊ विवेक, चुलत भाऊ संतोष, योगेश, मामेभाऊ अभिनाश पालकर, मामा नंदकुमार पालकर, भागीदार विक्रांत वाघुले, दलाल अनिल जोशी, अतुल देशपांडे, महेश मधुकर पूर्णपात्रे यांच्याविरुद्ध फसवणूक, कट रचणे, ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमध्ये हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम या कलमानुसार एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

यानंतर शहरातील अनेक लोक तक्रार देण्यासाठी पुढे आले. त्यांनाही प्रशांतने चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. काही दिवस व्याजाचे पैसे देऊन नंतर टाळाटाळ करू लागला. दरम्यान, लोकांकडून लुबाडले पैसे त्याने पुण्यासह अन्य शहरात कुठे गुंतवले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment